‘नागपूर पोलीस आयुक्तांचा सत्कार करणार’ -राधाकृष्ण विखे पाटील
By Admin | Published: January 26, 2017 04:53 AM2017-01-26T04:53:36+5:302017-01-26T04:53:36+5:30
नथुराम गोडसेवरील नाटकासाठी पोलिसांनी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास
मुंबई : नथुराम गोडसेवरील नाटकासाठी पोलिसांनी गोळीबाराची जाहीर धमकी देण्याप्रकरणी काँग्रेस आक्रमक झाली असून, नागपूर पोलीस आयुक्तांवर कारवाई न झाल्यास त्यांना जनरल डायरची पदवी देऊन सत्कार करू, अशी घोषणा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली.
बुधवारी पत्रकार परिषदेत ते बोलत होते. स्वयंघोषित राष्ट्रभक्तांच्या कार्यकाळात शांततामय मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना जाहीर फलक लावून गोळीबाराची धमकी देण्याची घटना ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणारी आहे. आपल्या २५ वर्षांच्या सार्वजनिक जीवनात एखाद्या साध्या आंदोलनात गोळीबाराची जाहीर धमकी देणारा फलक घेऊन पोलीस उभे असल्याचे मी कधीही पाहिले नाही. ही कार्यपद्धती पाहता पोलिसांना नागपुरात जालियानवाला बाग हत्याकांडाची पुनरावृत्ती करायची होती की काय, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचे त्यांनी सांगितले. नथुरामचे नाटक आणि तत्पूर्वी आरबीआयसमोरील आंदोलनाच्या वेळी काँग्रेस कार्यकर्त्यांवर जनरल डायरसारखी दडपशाही करण्याची नागपूर पोलिसांची मानसिकता दिसली. यावरून विरोधी पक्षनेत्यांनी मुख्यमंत्र्यांवरही तोफ डागली. गृह खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी या गंभीर घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यायला हवा. परंतु, भ्रष्ट मंत्र्यांना ‘क्लीन चिट’ची खिरापत वाटणारे मुख्यमंत्री स्वत:ला वेगळा न्याय देण्याची शक्यता नाही, असेही विखे म्हणाले.(विशेष प्रतिनिधी)