नागपूर अधिवेशन दहा दिवसांचेच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2016 05:20 AM2016-11-16T05:20:40+5:302016-11-16T05:20:40+5:30

नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन किमान चार आठवडे चाललेच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षात असताना करणाऱ्या भाजपा- शिवसेनेने

The Nagpur session is about ten days | नागपूर अधिवेशन दहा दिवसांचेच

नागपूर अधिवेशन दहा दिवसांचेच

Next

मुंबई : नागपूरला होणारे हिवाळी अधिवेशन किमान चार आठवडे चाललेच पाहिजे, अशी आग्रही मागणी विरोधी पक्षात असताना करणाऱ्या भाजपा- शिवसेनेने या वर्षीचे नागपूर अधिवेशन फक्त १० दिवसांचेच घेण्याचा प्रस्ताव कामकाज सल्लागार समितीत ठेवला असून तो मंजूरही झाला. त्यामुळे ५ डिसेंबर ते १७ डिसेंबर या कालावधीत अधिवेशन होईल. ज्यात १० ते १३ तीन दिवस सुटी असेल.
विधानभवनात मंगळवारी आधी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या दालनात आणि नंतर सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत अधिवेशन दोन आठवड्यांचे घेण्याचे निश्चित झाले. राज्यात जाहीर झालेल्या नगरपालिकांच्या निवडणुका, ५०० आणि एक हजाराच्या नोटांमुळे ग्रामीण भागात निर्माण झालेली परिस्थिती यामुळे अधिवेशनात किती कामकाज होईल, कोणती विधेयके यात घेतली गेली पाहिजेत, किती विधेयके शिल्लक आहेत याची आजच्या बैठकीत विस्ताराने चर्चा झाली.
भाजपाने कायम तीन ते चार आठवड्यांच्या अधिवेशनाची मागणी विरोधात असताना केली होती, आता मात्र १० दिवसांचेच अधिवेशन का, असा सवाल केला असता संसदीय कार्यमंत्री गिरीश बापट म्हणाले, याआधी देखील दोन आठवड्यांचे अधिवेशन झाले आहे. त्या काळात असणाऱ्या परिस्थितीचा विचार करून असे निर्णय याआधीही घेतले गेले आहेत. आजमितीला विधानसभेत दोन आणि विधान परिषदेत सहा विधेयके प्रलंबित आहेत, तर विविध विषयांवरील ११ विधेयके नव्याने प्रस्तावित केली जाणार आहेत. त्याशिवाय नवीन ४ विधेयके प्रस्तावित करण्यात आली आहेत. तर एक संयुक्त समितीकडे असून ११ अध्यादेश आहेत. त्यामुळे १० दिवसांत २४ विधेयके काढून घेण्याचे आव्हान सरकारपुढे असणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The Nagpur session is about ten days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.