नागपूर सुपर फास्ट !
By admin | Published: July 9, 2014 01:12 AM2014-07-09T01:12:27+5:302014-07-09T01:12:27+5:30
रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी संत्रानगरीला आठ रेल्वेगाड्यांची भेट दिली आहे. यात दोन गाड्या नागपुरातून धावणार असून इतर आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यात नागपूर ते बिलासपूर
दोन एक्स्प्रेस : आठ नवीन गाड्या धावणार
नागपूर : रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी संत्रानगरीला आठ रेल्वेगाड्यांची भेट दिली आहे. यात दोन गाड्या नागपुरातून धावणार असून इतर आठ गाड्या नागपूरमार्गे धावणार आहेत. यात नागपूर ते बिलासपूर आणि सिकंदराबादपर्यंतच्या सेक्शनमध्ये रेल्वेगाड्यांचा वेग १६० ते २०० किलोमीटर पर्यंत वाढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे या मार्गावरील प्रवासी आता सुपर फास्ट होणार आहेत.
रेल्वे अर्थसंकल्पात अमृतसर आणि पुण्यासाठी दोन रेल्वेगाड्या नागपुरातून धावणार आहेत. याशिवाय नागपूरमार्गे जाणाऱ्या इतर गाड्यांचा समावेश आहे. नागपूर ते बिलासपूर आणि सिकंदराबादपर्यंत रेल्वेगाड्यांचा वेग ताशी १६० ते २०० पर्यंत वाढविण्याचा निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला आहे. फक्त विदर्भात चांदाफोर्ट-नागभीड रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा थर्ड लाईनचे सर्वेक्षण करण्याचा उल्लेख अर्थसंकल्पात करण्यात आला आहे. रेल्वेगाड्यांकडे दृष्टी टाकल्यास गोंदिया-मुजफ्फरपूर एक्स्प्रेसचा बरौनीपर्यंत विस्तार करण्यात आला आहे. नव्या गाड्यात बल्लारशा मुंबई-काजीपेठ एक्स्प्रेस (साप्ताहिक) चालविण्यात येईल. नुकताच २५ जूनला रेल्वेच्या तिकिटाची दरवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे अर्थसंकल्पात दरवाढीची घोषणा करण्यात आली नसल्यामुळे प्रवाशांना दिलासा मिळाला आहे. अर्थसंकल्पात पीपीपी तत्त्वावर नव्याने विकसित करण्यात आलेल्या एअरपोर्टच्या धर्तीवर काही रेल्वेस्थानकांवर काही आधुनिक सुविधा देण्याची घोषणा करण्यात आली आहे. महानगर आणि काही महत्त्वाच्या जंक्शनच्या दहा रेल्वेस्थानकांचा विकास होणार आहे. परंतु यात कुठल्या रेल्वेस्थानकांचा समावेश असणार आहे याची घोषणा मात्र करण्यात आली नाही. यात नागपूर रेल्वेस्थानकाचा समावेश असल्याचा अंदाज आहे. जुन्या रेल्वेच्या प्रकल्पांसाठी कुठली तरतूद करण्यात आली याचे चित्र पिंक बुक आल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
काय होत्या अपेक्षा
- प्रस्तावित वर्ल्ड क्लास स्टेशनच्या यादीत नागपूर रेल्वेस्थानकाच्या बाबतीत काहीच उल्लेख नाही.
-कन्हान ते बुटीबोरीपर्यंत मेमू गाडी चालविण्याची घोषणा नाही.
-वर्धा-यवतमाळ-नांदेड रेल्वे मार्ग, नागपूर-सेवाग्राम थर्ड लाईनचा प्रकल्प, नागपूर-नागभिड ब्रॉडगेजचा प्रकल्प, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेजचा प्रकल्पाबाबत निधीबाबत काहीच उल्लेख नाही.
-नागपूरला झोन बनविण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष
-नागपूर-दिल्ली दुरांतोची घोषणा नाही
-तीर्थक्षेत्रासाठी एकही थेट रेल्वेगाडीची घोषणा नाही
-नागपूर-पुणे गरीबरथ डेली करण्याचा निर्णय नाही
-मागील रेल्वे अर्थ संकल्पात जाहीर करण्यात आलेल्या रेल्वे मेडिकल कॉलेज, मेकॅनाईज्ड लाँड्री, इंटिग्रेटेड सिक्युरिटी सिस्टीम, रेलनीर प्रकल्प, स्टेशनवर एक्झिक्युटिव्ह लाऊंज बनविण्यासह इतर घोषणांची अंमलबजावणी नाही.
चांदा फोर्ट-नागभीड दुपदरीकरण आणि भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव
-रेल्वेमंत्री सदानंद गौडा यांनी लोकसभेत सादर केलेल्या २०१४-१५ च्या रेल्वे अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील औरंगाबाद-चाळीसगाव आणि सोलापूर-तुळजापूर या दोन रेल्वे मार्गासह कर्जत-लोणावळा चौथा रेल्वे मार्ग, इटारसी-भुसावळ तिसरा रेल्वे मार्ग आणि विदर्भातील चांदा फोर्ट-नागभीड रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण तसेच भुसावळ-बडनेरा-वर्धा तिसऱ्या नव्या रेल्वे मार्गाचे सर्वेक्षण करण्याचा प्रस्ताव मांडला आहे.
-नव्या रेल्वे मार्गांच्या सर्वेक्षणाचा प्रस्ताव दिला आहेत ते रेल्वे मार्ग असे-
कनहनगढ-पनातूर-कनियुरु, मुगलसराय-भबुआ मार्गे नौघर-होशियारपूर-अम्ब अंदौरा, सिंगरौली-घोरावल-लूसा-गब्बूर-बेल्लारी, शिमोगा-शृंगेरी-मंगलौर, बदोवन-झारग्राममार्गे चांडिल-तालगुप्पा-सिद्धपूर, भबुआ-मुंडेश्वरी, जींद-हिसार, गदग-हरफनहल्ली-उना-हमीरपूर, उज्जैन-झलावाड-अगार-सुसनेर-सोयठ, हिसार-नरवाना, चारधाम-केदरानाथ- बद्रीनाथ, नयागढ-बांसपानी रेल्वे मार्गाचे दुपरीकरण, जयपूर-कोटा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, मंगलौर-उल्लाल-सूरतकल रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण, रेवाडी-महेंद्रगढ दुपदरीकरण.
काय मिळाले
थेट रेल्वेगाड्या
नागपूर-अमृतसर वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस
नागपूर-पुणे वातानुकूलित साप्ताहिक एक्स्प्रेस
नागपूरमार्गे जाणाऱ्या गाड्या
विजयवाडा-नवी दिल्ली वातानुकूलित रेल्वेगाडी
सिकंदराबाद-निजामुद्दीन प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडी
शालिमार-चेन्नई प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडी
कामाख्या-बंगळूर प्रीमियम वातानुकूलित रेल्वेगाडी
जयपूर-मदुराई प्रीमियम एक्स्प्रेस
हापा-बिलासपूर एक्सप्रेस
मुंबई-काजीपेठ साप्ताहिक बल्लारशाहमार्गे
विस्तार केलेली गाडी
गोंदिया-मुजफ्फरपूर एक्स्प्रेसचा बरौनीपर्यंत विस्तार