नऊ तासात पूर्ण होईल नागपूर-सुरतचा प्रवास
By admin | Published: July 6, 2014 12:44 AM2014-07-06T00:44:05+5:302014-07-06T00:44:05+5:30
सर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा
राष्ट्रीय महामार्गाच्या कामाला गती : जमीन अधिग्रहणाबाबत लवकरच चर्चा
वसीम कुरेशी - नागपूर
सर्वसाधारणपणे रेल्वेचा प्रवास रस्ते मार्गापेक्षा लवकर पूर्ण होतो. परंतु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ ने ही बाब खोटी ठरवून प्रवाशांना अर्ध्या वेळेतच त्यांना जेथे जायचे आहे तेथे पोहोचविण्याचा मार्ग खुला केला आहे. यामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चे १९४९ किलोमीटरचे अंतर फक्त २० तासात पूर्ण होऊ शकणार आहे. रेल्वेगाडीत हेच अंतर कापण्यासाठी ३७ तास लागतात. अशास्थितीत नागपूर-सुरत या मार्गाचे ८७५ किलोमीटरचे अंतर फक्त ९ तासात पूर्ण होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर अमरावती ते जळगाव (२७५ किलोमीटर) आणि जळगाव ते धुळेपासून पुढे महाराष्ट्र, गुजरातच्या सीमेपर्यंत(२०८ किलोमीटर)ची निविदा फेब्रुवारी २०१४ मध्ये झाली आहे. कंत्राट देण्याच्या करारानंतर सहा महिने होऊनही कंत्राटदाराला जमीन मिळू शकली नाही. यावर कंत्राटदाराने आपले कंत्राट सोडण्याची सूचनाही केली आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित कंत्राट घेणाऱ्या कंपनीने नुकसान भरपाईची मागणी केली आहे. परंतु संबंधित कंत्राटदाराची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ अंतर्गत महाराष्ट्राच्या संबंधित दोन्ही भागात ८० टक्के जमीन अधिग्रहण करण्याचे काम शिल्लक आहे. भूदल मंत्रालयातर्फे या प्रकरणी राज्य शासनाशी लवकरच चर्चा करण्यात येणार आहे. अमरावतीपासून धुळेपर्यंत ४८३ किलोमीटरच्या भागात २ लेनला ४ लेन बनविण्यासाठी डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याची सूचना ठेवण्यात आली आहे. सुरुवातीला येथे डांबरीकरण करून रस्ता तयार करण्याचा प्रस्ताव होता. परंतु मंत्रालय कमी देखभाल आणि मजबुतीच्या दृष्टीने येथे सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करण्याच्या बाजूने आहे.
तज्ज्ञांच्या मते डांबराच्या रस्त्याची पाच वर्षांनंतर डागडुजी करावी लागते. परंतु सिमेंट काँक्रिटच्या रस्त्याला ३० वर्षे देखभालीची गरज नसते.
राष्ट्रीय महामार्ग ६ विकसित झाल्यानंतर मुंबई-इंदोर-आगरा (राष्ट्रीय महामार्ग ३) ला गती मिळू शकणार आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ आणि ३ धुळ्याजवळ ‘क्रॉस’ होतात. विकास कामामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ चा वापर करून इंदोर, आगरा अथवा मुंबई जाणाऱ्यांना अधिक सुविधा मिळणार आहे.