Nagpur Teachers Constituency : नागपूर शिक्षक निवडणुकीत भाजपचा 'या' उमेदवाराला जाहिर पाठिंबा, देवेंद्र फडणवीसांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2023 06:29 PM2023-01-15T18:29:22+5:302023-01-15T18:29:47+5:30
Nagpur Teachers Constituency : नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
Nagpur Teachers Constituency : राज्यात सध्या विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुकांचे वारे वाहत आहेत. एकीकडे नाशिक पदवीधर जागेवरुन मोठा गोंधळ उडाला असताना, दुसरीकडे नागपूर शिक्षक मतदारसंघासाठी भाजपने नागो गाणार (Nago Ganar) यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्र शिक्षक परिषद नागपूर शिक्षक मतदारसंघाची जागा लढवते आणि भाजपचा त्यास पाठिंबा असतो. यंदांही महाराष्ट्र शिक्षक परिषदेने नागो गाणार यांना उमेदवारी दिली आहे. गाणार यांच्या उमेदवारीला भाजपचा पाठिंबा असणार आहे. याबाबत माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, गेली बारा वर्षे नागो गाणार आमदार राहिले आहेत, पण त्यांच्यामध्ये कोणताही बदल झाला नाही. त्यांच्यावर कोणीही भ्रष्ट्राचाराचा आरोप करू शकत नाही.
गेल्या अनेक वर्षांपासून नागो गाणार सातत्याने शिक्षकांचे प्रश्न लावून धरतात. व्रतस्थपणे काम करणारे नेते फार कमी असतात, त्यापैकी एक गाणार आहेत. अनेक वर्षांपासून आमदार असूनही गाणार आजही जमिनीवरच आहेत. काही लोक आमदार होताच त्यांची विमान हवेत उडतात, मात्र गाणार हे शिक्षकांच्या प्रश्नासाठी भिडतात आणि प्रश्न सुटेपर्यंत लढत राहतात. गेली अनेक वर्षे ही जागा शिक्षक परिषद वाढवते आणि भाजप त्यांना समर्थन देते यावर्षी सुद्धा आपण त्यांना समर्थन दिले आहे, असे फडणवीस म्हणाले.