नागपूर दूरदर्शन केंद्र ठरतेय प्रशासनासाठी पांढरा हत्ती
By Admin | Published: June 19, 2017 01:35 AM2017-06-19T01:35:49+5:302017-06-19T01:35:49+5:30
२०१५-१६ मध्ये वर्षभरात नागपूर दूरदर्शनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनापोटीच सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च झाला होता.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : २०१५-१६ मध्ये वर्षभरात नागपूर दूरदर्शनचे अधिकारी, कर्मचारी यांच्या वेतनापोटीच सुमारे सहा कोटी रुपयांचा खर्च झाला होता. मात्र वर्षभरात केंद्राला प्राप्त होणाऱ्या उत्पन्नाचा आकडा केवळ साडेसात लाखच होता. त्यातही नागपूर दूरदर्शनकडून दिवसभरात केवळ एक तासच प्रसारण करण्यात येते.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर दूरदर्शन केंद्राकडे याबाबत विचारणा केली होती. केंद्रात १०६ मंजूर पदे आहेत. त्यापैकी २७ पदे रिक्त आहेत.
२०१५-१६ या कालावधीत अधिकारी-कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यापोटी ५ कोटी ९७ लाख ५४ हजार ५३२ रुपयांचा खर्च झाला. मात्र, या कालावधीत प्रसारभारतीला दूरदर्शन केंद्रापासून अवघा ७ लाख ४७ हजार २५० रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. यातील सुमारे साडेतीन लाख रुपये विविध लिलावातून मिळाले होते.