नागपूर विद्यापीठाचे ‘वेट अॅण्ड वॉच’
By admin | Published: November 4, 2015 02:39 AM2015-11-04T02:39:50+5:302015-11-04T02:39:50+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ‘बीसीसीए’ऐवजी चक्क ‘बीकॉम’चा पेपर देण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना ‘बीसीसीए’ऐवजी चक्क ‘बीकॉम’चा पेपर देण्यात आल्याची बाब समोर आल्यानंतर प्रशासनात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात मंगळवारी विद्यार्थ्यांनी परीक्षा नियंत्रकांकडे तक्रार केली. विद्यापीठाने या मुद्द्यावर संबंधित महाविद्यालयाकडून अहवाल मागवला आहे व त्यानंतरच पुढील पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान, महाविद्यालयाकडून विद्यार्थ्यांकडेच अंगुलीनिर्देश करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सोमवारी धरमपेठ एम.पी. देव विज्ञान महाविद्यालयात ‘बीसीसीए’ भाग २चा पेपर दुपारी २ ते ५ या कालावधीत होता. या केंद्रावर ‘बीबीए भाग १’, ‘बीकॉम भाग २’ या अभ्यासक्रमांचेदेखील पेपर होते. सर्व अभ्यासक्रमांचा ‘कॉस्ट अॅण्ड मॅनेजमेंट अकाउंटिंग’ या विषयाचाच पेपर होता. ‘बीसीसीए’च्या विद्यार्थ्यांना ‘बीकॉम’ची प्रश्नपत्रिका देण्यात आली. विद्यार्थ्यांनी पर्यवेक्षकांना माहिती दिली. परंतु विद्यापीठाकडून याच प्रश्नपत्रिका आल्या असून, त्याच तुम्हाला सोडवाव्या लागतील, असे उत्तर मिळाल्याचा दावा विद्यार्थ्यांनी केला होता.