‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’; भाजप आमदारांची मुख्यमंत्र्यांवर टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2019 12:57 PM2019-12-18T12:57:29+5:302019-12-18T12:58:33+5:30
तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली.
नागपूर: नागपुरात सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनात तिसऱ्या दिवशीही विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून आक्रमक होताना पाहायला मिळाले. 25 हजार रुपये हेक्टरी भाव दिलाच पाहिजे या मागणीसाठी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी हातात सामनाचे फलक घेऊन भाजपच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने केली. ‘सोनियांचा पोपट काय म्हणतो, 25 हजाराला नाही म्हणतो’ अशा घोषणा देत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर भाजप आमदारांनी टीका केली.
विधानसभेत मंगळवारी भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली होती. तर ‘सामना’तील बातमीचं पोस्टर सुद्धा भाजपच्या आमदारांकडून विधानसभेत झळकवण्यात आले होते. त्यानंतर शिवसेनेचे आमदारही आक्रमक झाले व त्यातून धक्काबुक्कीचा प्रकार घडल्याचे सुद्धा समोर आले होते.
तर आज तिसऱ्या दिवशी सुद्धा भाजप आमदारांनी शेतकऱ्यांना 25 हजारांची मदत देण्यात यावी अशी मागणी लावून धरली. तर शेतकरी कर्जमाफीची घोषणा होईपर्यंत भाजप आमदारांनी विधीमंडळाचं कामकाज रोखून धरण्याचा पवित्रा घेतला. हेक्टरी 25 हजारांची मदत झालीच पाहिजे, दिलेला शब्द पूर्ण करा, अशा मागण्याची घोषणाबाजी भाजप आमदारांनी विधीमंडळाच्या पायऱ्यांवर केली.
‘सोनियांचा पोपट काय म्हणतो’ अशी हाक आशिष शेलार यांनी दिल्यानंतर ’25 हजाराला नाही म्हणतो’ अशा शब्दात भाजप आमदारांनी उत्तर दिलं. तसेच ‘सामना’तील बातमीचं पोस्टर धरुन आमदारांनी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. तर शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, अधिवेशनापूर्वी शेतकऱ्यांना चिंतामुक्त करावे अशी मागणीसुद्धा यावेळी भाजप आमदारांनी केली.