नागपूरकरांची ‘सोशालास’ झेप
By admin | Published: May 12, 2014 06:02 AM2014-05-12T06:02:19+5:302014-05-12T06:02:19+5:30
नवव्या वर्गात शिकणारे साक्षी रवींद्र जवादे, राधा सुमंत मुंडले, अतनू सुधांशू कोठे व निषाद काळे या विद्यार्थ्यांच्या ‘सोशालास’ या संशोधनाला वर्ल्ड रॅकिंगमध्ये तृतीय पारितोषिक मिळाले आहे.
नागपूर : केवळ पाठ्यपुस्तकांच्या मर्यादित अभ्यासावर अवलंबून न राहता शिक्षणाच्या पारंपरिक चौकटीबाहेर जाऊन ज्ञानाची नवीन दालने उघडता यावी, यासाठी अमेरिकेच्या नासा या अंतराळ संशोधन संस्थेच्या माध्यमातून जगभरात विविध स्तरांवर चाचण्या घेतल्या जातात. अगदी पहिल्या वर्गातील मुलांपासून ते विविध विषयांत उच्च शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांचा यात समावेश असतो. जगभरातले हुशार विद्यार्थी या चाचण्या देत असतात़ यासाठी दरवर्षी भारतातीलही अनेक शाळांना नासाचे निमंत्रण येत असते. परंतु, काहीच शाळा हे शिवधनुुष्य पेलू शकतात़ या क्रमात यंदा आपल्या नागपूरच्या आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूलने अफाट कामगिरी केली असून या शाळेत नवव्या वर्गात शिकणारे साक्षी रवींद्र जवादे, राधा सुमंत मुंडले, अतनू सुधांशू कोठे व निषाद काळे या विद्यार्थ्यांच्या ‘सोशालास’ या संशोधनाला वर्ल्ड रॅकिंगमध्ये तृतीय पारितोषिक मिळाले आहे़ लॉस एंजेलिस येथे होणार्या नॅशनल स्पेस सोसायटीच्या ३३ व्या अधिवेशनात भाग घेण्यासाठी या नागपूरकर हीरोंना निमंत्रण आले असून आज १२ मे रोजी ही सर्व मंडळी अमेरिकेला रवाना होत आहे. यंदा या स्पर्धेमध्ये १९ देशांनी सहभाग नोंदविला. यात एकूण १५६७ विद्यार्थ्यांचा समावेश होता़ त्यामध्ये नागपूरच्या आर.एस. मुंडले इंग्लिश स्कूलच्या १० मुलांच्या चमूने तयार केलेल्या ‘सोशालास’ म्हणजे अंतराळात मानवी शेती करता येणे शक्य आहे, हे सांगणारा प्रोजेक्ट सादर केला़ या प्रोजेक्टला नासाचे तृतीय पारितोषिक मिळाले़ १४ ते १८ मे नॅशनल स्पेस सोसायटीच्या ३३ व्या अधिवेशनासाठी ही मंडळी लॉस एंजेलिससाठी आज नागपूर येथून रवाना होणार आहे. तेथे आयोजित अधिवेशनात ते आपले सोशलास या प्रोजेक्टवर आपले मत मांडणार आहेत. काय आहे सोशालास ? च्साक्षी, राधा, अतनू, निषाद व त्यांच्या इतर सहकार्यांनी तयार केलेला सोशलास हा प्रकल्प म्हणजे अंतराळात स्पेसशिप पाठवून मानवी वस्ती तयार करण्यासंदर्भातला अभ्यास आहे. चंद्र व पृथ्वीच्या मध्यातील अंतराळातील (आॅरबिट) एल फाइव्ह या पट्ट्यात मानवी वसाहती तयार करण्याच्या दृष्टीने आखलेला हा प्रकल्प आहे. नासाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी मानल्या जाणार्या प्रकल्पावर सध्या जोरदार संशोधन सुरू आहे. आपल्या प्रकल्पात या मंडळींनी याच संशोधनाला पुढे नेले आहे़ अंतराळात गरजेपुरती शेती कशी करता येऊ शकेल, यावर या विद्यार्थ्यांनी विशेष काम केले आहे. या प्रकल्पासाठी तयार करण्यात येणारे मॉडेल (स्ट्रक्चर) हे अॅल्युमिनियम, टायटेनियम, स्टीलचा वापर करून बनवण्यात आले आहे. हा धातू चांगला असून त्याला अपाय होत नाही. नासा अंतराळ वसाहतीच्या या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचा प्रयोग पुढच्या वर्षी म्हणजे २०१५ साली करणार आहे. नासाची शिष्यवृत्ती मिळावी अंतराळात प्रचंड मोठमोठ्या घडामोडी घडत असतात, पण त्याकडे वैज्ञानिक वगळता इतर कुणी फारसे लक्ष देत नाही़ विज्ञानाच्या विद्यार्थ्यांना अंतराळात सुरू असलेल्या घडामोडींचे कुतूहल असते. पण, त्यासाठी विज्ञान समजून घेणे आवश्यक आहे. हे समजावून घेणे व चांगल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणे हा या स्पर्धेमागील हेतू आहे. नासाची शिष्यवृत्ती मिळवूनच पुढील शैक्षणिक वाटचाल करण्याची इच्छादेखील या मुलांनी व्यक्त केली आहे. शाळेत साजरा होतोय आनंदोत्सव साक्षी, राधा, अतनू, निषाद यांनी मिळवलेल्या यशाने त्याचे आई-वडील आनंदी आहेत. आपल्या मुलाने आपले नावच उज्ज्वल केले नाही तर त्यांनी केलेले काम हे अनेकांना प्रेरणा देणारे आहे. या विद्यार्थ्यांच्या शाळेतही आनंदाचे वातावरण आहे. त्यांच्या मार्गदर्शिका व शिक्षिका नीता देशपांडे, वर्षा पांडे यांचे या विद्यार्थ्यांनी आभार मानले आहेत. शिक्षकांना त्याच्यातील प्रतिभा लक्षात घेऊन त्यांना वेळोवळी सहकार्य केले.