नागराज मंजुळे यांचा घटस्फोट कायदेशीरच!
By Admin | Published: May 14, 2016 03:04 AM2016-05-14T03:04:23+5:302016-05-14T03:04:23+5:30
पुन्हा नांदविण्याची मागणी करणाऱ्या सुनीता लष्करे यांच्याशी ‘सैराट’फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१४मध्येच न्यायालयात रीतसर घटस्फोट झाल्याचे पुढे आले आहे.
पुणे : पुन्हा नांदविण्याची मागणी करणाऱ्या सुनीता लष्करे यांच्याशी ‘सैराट’फेम प्रसिद्ध दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचा २०१४मध्येच न्यायालयात रीतसर घटस्फोट झाल्याचे पुढे आले आहे. मात्र, फसवणूक करून आपल्याला घटस्फोट दिल्याचा आरोप सुनीता यांनी केला आहे.
‘नागराज मंंजुळेची पत्नी करतेय धुणी-भांडी’ हे वृत्त ‘लोकमत’मध्ये शुक्रवारी प्रसिद्ध झाल्यानंतर सोशल मीडियावर याबाबत उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.
पडत्या काळात कष्ट करून साथ दिली, मात्र ज्यांच्यामुळे यश मिळाले त्यांनाच नागराज मंजुळे यांनी
दूर लोटले, असा आरोप करीत मला पत्नी म्हणून पुन्हा नांदवावे, अशी मागणी मंजुळे यांच्या घटस्फोटीत पत्नी सुनीता यांनी गुरूवारी केली होती.
मात्र, यासंबंधीची न्यायालयीन कागदपत्रे ‘लोकमत’च्या हाती आली असून या कागदपत्रांनुसार १० नोव्हेंबर २०१४ रोजी नागराज आणि सुनीता या दोघांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेतला होता.
यासाठी सुनीता यांना सात लाख रुपयांची एकरकमी पोटगीही देण्यात आली होती. शिवाय, सुनीता यांनी पत्नी म्हणून सर्व अधिकार सोडत असल्याचे तसेच भविष्यात कोणत्याही स्थावर वा जंगम मालमत्तेवर अधिकार मागितला नसल्याचेही कबुल केले होते. (प्रतिनिधी)
सुनीता आठवी पास आहे. मंजुळे कुटुंबासाठी तिने अनेक खस्ता खाल्या. घटस्फोटाचा खटला दाखल झाल्यावर सततच्या तारखांनी ती वैतागून गेली होती. त्यामुळे तिने सह्या करून टाकल्या.
- हरिश्चंद्र लष्करे, सुनीता यांचे वडील
आपल्याला फसवून घटस्फोट घेण्यात आला. आपण पैसेही घेतले होते. मात्र, घटस्फोट होत आहे, असे सांगण्यात आले नव्हते.
- सुनीता लष्करे