नायब तहसीलदारावर फसवणुकीचा गुन्हा
By Admin | Published: January 16, 2015 05:51 AM2015-01-16T05:51:16+5:302015-01-16T05:51:16+5:30
संजय गांधी निराधार योजनेचा शेकडो बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देणारा नायब तहसीलदार पी.पी. सोळंके याला १२ जानेवारी रोजी
धारणी (जि. अमरावती) : संजय गांधी निराधार योजनेचा शेकडो बोगस लाभार्थींना आर्थिक लाभ देणारा नायब तहसीलदार पी.पी. सोळंके याला १२ जानेवारी रोजी विभागीय आयुक्तांनी निलंबित केल्यानंतर या प्रकरणाची तक्रार उपविभागीय अधिकाऱ्यांनी धारणी पोलीस ठाण्यात केली आहे. त्यावरून पोलिसांनी गुरुवारी नायब तहसीलदारासह अपात्र लाभार्थींवर फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
शासनाकडून निराधार वृद्धांसाठी राबविण्यात येणाऱ्या संजय गांधी योजना, वृद्धापकाळ, श्रावणबाळ, राजीव गांधी योजनेमध्ये २५ ते ४० वयोगटातील २ हजार बोगस लोकांना पात्र दाखवून शासनाचे लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान संजय गांधी
योजनेचे नायब तहसीलदार व कर्मचारी करीत होते.
त्यामध्ये शेकडो बोगस लाभार्थींना खोटे दस्तऐवज तयार करणारे दहापेक्षा अधिक दलाल तहसीलमध्ये सक्रिय होते. त्यांनी आर्थिक आमिषाने वयाचा दाखला देणाऱ्या येथील उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षकांसह पूर्ण अहवाल दाखला देणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, पूर्ण अहवाल ओके म्हणणाऱ्या तलाठी आणि बँकेचे व्यवस्थापक, लेखापालाची चौकशी केली. बोगस नवयुवक लाभार्थींना अनुदानाची रक्कम थेट त्यांच्या हातात देताना वयाची पाहणी न करता या पूर्ण घोटाळ्यात सहभागी होऊन मूकसंमती देणारी टोळी सक्रिय असल्याचे उघड झाल्याने जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी अव्वल कारकुनासह तीन कर्मचाऱ्यांना ९ जानेवारी रोजी निलंबित केले होते.
नायब तहसीलदार सोळंके याच्या निलंबनाचा प्रस्ताव विभागीय आयुक्तांना पाठवून संपूर्ण प्रकरणात एसडीओंवर फौजदारी कारवाईचे आदेशदेखील दिले आहेत. या प्रकरणी ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून हा गैरप्रकार उघडकीस आणला होता़ (वार्ताहर)