नायगाव रेल्वे उड्डाणपूलाच्या गर्डरला तडे
By Admin | Published: March 3, 2017 02:32 AM2017-03-03T02:32:48+5:302017-03-03T02:32:48+5:30
नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ््या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना ताजी असतांनाचा गर्डरला पुन्हा तडे गेले आहेत.
वसई : नायगाव पूर्व-पश्चिम जोडणाऱ््या उड्डाणपुलाचा गर्डर कोसळल्याची घटना ताजी असतांनाचा गर्डरला पुन्हा तडे गेले आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पूल पूर्ण करण्याची मुदत आहे. मात्र, सध्या काम अतिशय मंद गतीने सुरु असल्याने तो मुदतीत पूर्ण होणार नाही हेही स्पष्ट झाले आहे.
गेल्या दीड महिन्यापूर्वी उड्डाणपूलाचा एक गर्डर तडे गेल्याने कोसळला होता. त्याचवेळी पूलाच्या बांधकामाबाबत शंका उपस्थित केली जात होती. आता पुन्हा एकदा दुसऱ्या एका गर्डरला तडे गेले आहेत. हे निदर्शनास आल्यानंतर एमएमआरडीने केलेल्या पुलाच्या निकृष्ट कामावर टीकेची झोड उठू लागली आहे. तर दुसरीकडे गर्डरला तडे गेले कसे? याबाबत एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करण्यात येत आहे. तडे गेल्याने गर्डरचा अर्धा भाग खाली उतरविण्यात आला असून उरलेला भाग उतरविण्याचे काम सुरू आहे. याआधी गर्डरला तडे गेल्यामुळे एमएमआरडीएला सुमारे ३० लाखांचा फटका सोसावा लागला आहे. येत्या डिसेंबर २०१७ पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याची मुदत आहे. परंतु आता पुलाचा काही भाग पुन्हा नव्याने करावा लागणार आहे. पुलाचे काम योग्य साधनसामुग्री वापरूनच चालू केल्याचे एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. गर्डरला तडे गेलेच कसे, याबाबत अधिकाऱ््यांमार्फत चौकशी करण्याचे काम चालू असल्याचे एमएमआरडीए प्रशासनाने सांगीतले.
नायगाव पूर्व आणि पश्चिमेल जोडणारा एकही मार्ग नाही. वसई गावातील लोकांना मोठा वळसा घालून मुंबई आणि ठाण्याकडे ये-जा करावी लागत आहे. तर नायगाव पूर्वेकडील भागातील लोकांना महत्वाच्या प्रशासकीय कामांसाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यासाठी नायगाव रेल्वे उड्डाणपूल बांधण्याचे काम एमएमआरडीएने २०१४ रोजी सुरु केले. त्याआधी मंजूरी मिळूनही पूलाचे काम विविध कारणास्तव अनेक वर्षे रखडून पडले होते.
पुलाच्या कामासाठी सर्व परवानग्या मार्गी लागल्या असल्या तरी रेल्वे प्रशासनाने या कामासाठी अद्याप हिरवा कंदिल दिला नसल्याने पुलाच्या कामात अडथळा उत्पन्न झाला आहे. सद्यस्थितीत रेल्वे हद्दीतील पूलाचे काम बंद आहे. वसई पश्चिमेतील उमेळे गावाकडील बाजूकडून पुलावर १५ ते २० फूट उंचीचे गर्डर आडवे टाकण्याचे काम सुरू आहे.
दोन्ही बाजूंनी पूल तयार झाल्यानंतर रेल्वेकडून मेगा ब्लॉक घेऊन रेल्वेच्या हद्दीतील गर्डर टाकण्यात येणार आहेत. येत्या डिसेंबरपर्यंत पूलाचे काम पूर्ण होणे अशक्य असल्याचे एमएमआरडीएचे अधिकारी सांगत आहेत. (वार्ताहर)