नेरळच्या सरपंचपदी नाईक
By admin | Published: April 27, 2016 03:23 AM2016-04-27T03:23:16+5:302016-04-27T03:23:16+5:30
रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक या विजयी झाल्या.
कर्जत : रायगड जिल्ह्यातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेल्या नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक या विजयी झाल्या. सरपंचपदासाठी झालेल्या निवडणुकीत नाईक यांनी नेरळ विकास आघाडीच्या जान्हवी साळुंखे यांचा पराभव केला. नेरळ विकास आघाडीच्या राजश्री कोकाटे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.
नेरळ ग्रामपंचायतीच्या रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी पीठासीन अधिकारी जे. टी. उबाळे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक घेण्यात आली. निर्धारित वेळेत नेरळ ग्रामपंचायतीच्या नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला राखीव सरपंचपदासाठी चार महिला सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. विशेष सभेत दाखल अर्जांची छाननी करण्यात आली. त्यानंतर निर्धारित वेळेत दाखल अर्जांपैकी शेकापच्या संजीवनी हजारे आणि नेरळ विकास आघाडीच्या कौसर सहेद यांनी आपले नामांकन अर्ज मागे घेतले. त्यामुळे नेरळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी शिवसेनेच्या सदस्या सुवर्णा नाईक आणि नेरळ विकास आघाडीच्या जान्हवी साळुंखे यांच्यात निवडणूक घेण्यात आली. त्यावेळी झालेल्या गुप्त मतदानात नाईक यांना नऊ, तर साळुंखे यांना आठ मते पडली. त्यामुळे सुवर्णा नाईक विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले. नवनिर्वाचित सरपंच शिवसेनेच्या सुवर्णा नाईक यांचे रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्यासह राष्ट्रवादीचे नेते तानाजी चव्हाण, अशोक भोपतराव आदींनी अभिनंदन केले. (वार्ताहर)