३ जिल्ह्यांत नाकाबंदी, ५ तास इंटरनेट बंद; मराठवाड्यात मराठा आंदोलनाचे पडसाद
By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2024 06:26 AM2024-02-27T06:26:09+5:302024-02-27T06:26:33+5:30
बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/छत्रपती संभाजीनगर/ बीड : मराठा आरक्षण आंदोलन तीव्र होत असल्याने सोमवारी छत्रपती संभाजीनगर, बीड आणि जालना जिल्ह्यात पोलिसांनी नाकाबंदीसह इंटरनेट सेवा ५ तास बंद केली. पोलिसांनी कठोर भूमिका घेत बीड- जालना जिल्ह्याची सीमा बंद केली. जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात तीर्थपुरी येथे अज्ञातांनी एसटी बस पेटविली. अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
बीड जिल्ह्यात यापूर्वी झालेल्या आंदोलनाच्या वेळी जाळपोळीच्या गंभीर घटना घडल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर आणि मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचे लक्षात घेऊन पोलिस आणि जिल्हा प्रशासनाने सोमवारी तातडीने इंटरनेट सेवा बंद केली. अंतरवाली सराटी येथे कार्यकर्ते अमू नयेत यासाठी अंबड तालुक्यात संचारबंदी लागू करण्यात आली, जालना, बीड व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात मोठा पोलिस बंदोबस्त होता. जरांगे-पाटील परतल्याने सोमवारी मध्यरात्रीपासून संचारबंदी लागू केली.
तीर्थपुरीत बस पेटविली
जरांगे-पाटील यांचे सहकारी असलेले तीर्थपुरी नगरपंचायतचे उपाध्यक्ष शैलेंद्र पवार यांना सोमवारी पहाटे पोलिसांनी राहत्या घरातून ताब्यात घेतले. त्याच्या निषेधार्थ तीर्थपुरी शहरात बंद पुकारण्यात आला होता. सोमवारी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबड आगाराची बस पेटवून दिली, यामुळे तणावाचे वातावरण होते.
जालना जिल्ह्यात बस पेटविल्याच्या घटनेनंतर एसटी बससेवा सोमवारी सकाळी ९ वाजता अचानक बंद करण्यात आली. प्रवाशांना घेऊन धावणाऱ्या बसेसही बसस्थानकामध्येच रोखण्यात आल्या होत्या. जिल्ह्यातील ५३९ बसेसचा प्रवास दोन तासांसाठी ठप्प झाला. परिणामी, बस आणि बसस्थानकांमध्ये दोन तास हजारो प्रवासी ताटकळले होते. या संधीचा फायदा घेत खासगी वाहतूकदारांनी मनमानी भाडे वसूल करीत प्रवासी वाहतूक केली. पोलिसाच्या सूचनेनंतर सकाळी ११ वाजेनंतर पुन्हा बससेवा सुरळीत करण्यात आली.
कुठे काय घडले?
जालना : जिल्ह्यात प्रवेश करणाच्या १२ मार्गावर नाकेबंदी, इंटरनेट सेवा सायं. ५ वाजेपर्यंत बंद
बीड: राक्षसभुवन येथे जालना आणि बीड जिल्ह्याची सीमा सील, २८ ठिकाणी नाकेबंदी, इंटरनेट सेवा सायंकाळी ५ वाजेपर्यंत बंद
छत्रपती संभाजीनगर: सायं. ५ वाजेपर्यंत इंटरनेट सेवा बंद, आरटीओ, मनपा तसेच शासकीय कार्यालयातील ऑनलाइन कामावर परिणाम झाला.