विधवेला नग्न अंघोळीची शिक्षा
By admin | Published: February 3, 2016 03:32 AM2016-02-03T03:32:53+5:302016-02-03T03:32:53+5:30
नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात
नाशिक : नंदुरबार येथील कंजारभाट समाजाच्या जातपंचायतीने एका विधवा महिलेला चारित्र्य सिद्ध करण्यासाठी पंचांसमोर नग्न अंघोळ करण्याची, तर तिच्या बारा वर्षाच्या मुलाला तापवलेली कुऱ्हाड हातात ठेवण्याची शिक्षा अमानवीय सुनावली आहे. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या फतव्याविरोधात संताप व्यक्त होत असून, पीडित महिलेने नाशिक पोलीस अधीक्षकांकडे तक्रार केली आहे.
ओझर (ता. निफाड, जि. नाशिक) येथील महिलेचा १७ डिसेंबर २००० मध्ये नंदुरबारच्या युवकाशी विवाह झाला होता. २०१३ मध्ये तिच्या पतीचे अचानक निधन झाले. त्यानंतर तिच्या मावस दिराने तिच्याकडे लग्नासाठी आग्रह धरला.
तिने नकार देताच त्याने तिच्या सासू व दिराला खोटी माहिती दिली. त्यातून महिलेस मारहाण झाली. मावसदिराने तिचा विनयभंगही केला. त्यानंतर जातपंचायतीचे दीपक तमायचेकर, ज्ञानेश्वर गुमाने व कांती नेतले यांनी महिलेच्या आई-वडिलांना बोलावून घेत जातपंचायतीत प्रकरणाचा निवाडा करण्याचा सल्ला दिला. जातपंचायतीने छळ करणाऱ्यांना सोडून महिलेवरच अनैतिक संबंधांचे आरोप लावले. त्यानंतर पीडित महिला ओझरला माहेरी राहू लागली. मात्र त्यानंतर पंचकमिटीने तिला त्रास देणे सुरूच ठेवले. (प्रतिनिधी)
कथित कलंकित महिलेने पंचांसमोर फक्त सव्वा मीटर कापडाने अंग झाकावे. तिने १०७ पावले चालावे. तिच्यासोबत दोन महिला असतील. त्यापैकी एक तिला गव्हाच्या पिठाचे गरम गोळे फेकून मारील, तर दुसरी तिला रुईच्या गरम लाकडाने बडवेल. यानंतर महिलेला पंचांसमोरच दूध व पाण्याने अंघोळ करावी लागेल.