द.मध्य मुंबईत नालेसफाई ठप्प

By admin | Published: May 3, 2017 06:45 AM2017-05-03T06:45:02+5:302017-05-03T06:45:02+5:30

महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाल्यांच्या सफाईला मुंबईत सुरुवात झाली खरी, पण सखल भाग असल्याने दर पावसाळ्यात

Nalasefai jam in Mumbai | द.मध्य मुंबईत नालेसफाई ठप्प

द.मध्य मुंबईत नालेसफाई ठप्प

Next

मुंबई : महिन्याभराच्या प्रतीक्षेनंतर नाल्यांच्या सफाईला मुंबईत सुरुवात झाली खरी, पण सखल भाग असल्याने दर पावसाळ्यात पाण्याखाली जाणाऱ्या दक्षिण मध्य मुंबईत अद्याप ठेकेदार सापडलेला नाही. त्यामुळे येथील नाले गाळात असून, पावसाळ्यात येथे पाणी तुंबण्याची भीती स्थानिक नगरसेवक व्यक्त करीत आहेत.
दोन वर्षांपूर्वी नालेसफाईच्या कामाचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र, यात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर, प्रशासनाने ठेकेदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत. घोटाळेबाज ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची भूमिका आयुक्तांनी घेतल्यामुळे ठेकेदारांचे धाबे दणाणले आहेत. त्यामुळे या वर्षी नालेसफाईच्या कामासाठी महापालिकेला कोणी ठेकेदार मिळेनासा झाला. बऱ्याच प्रयत्नानंतर एप्रिल महिन्याच्या अखेरीस निविदेला प्रतिसाद मिळून नालेसफाईच्या कामाला सुरुवात झाली, परंतु मे महिना उजाडला, तरी अद्याप बऱ्याच ठिकाणी नाल्यांच्या सफाईने वेग घेतलेला नाही.
त्यात एफ उत्तर, एफ दक्षिण, जी उत्तर, जी दक्षिण या दक्षिण मध्य मुंबई भागात ठेकेदार मिळालेले नाहीत. अनेक ठिकाणी नाल्यांमधील गाळ काढण्याचे काम ठप्प पडले आहे. अँटॉप हिल, दादर, माटुंगा, सायन, वडाळा, प्रभादेवी, करी रोड, परळ या दक्षिण मध्य मुंबईत मोठे नाले गाळात आहेत. त्यामुळे स्थानिक
नागरिक नाराज असून, नगरसेवकांना त्यांच्या रोषास सामोरे जावे लागत आहे.
या विभागांमध्ये भुयारी नाले असल्याने, सफाईसाठी कोणी पुढे येत नसल्याचे अधिकारी सांगतात. अखेर ठेकेदारांचा नाद सोडून बिगर शासकीय संस्थांमार्फत या विभागांमधील नाल्यांची सफाई होणार आहे. (प्रतिनिधी)


एनजीओमार्फत सफाईचा प्रस्ताव

सफाईसाठी दक्षिण मध्य मुंबईत आता बिगर शासकीय संस्थेच्या कामगारांना उतरवण्याचा पालिकेचा विचार सुरू आहे. याबाबतचा प्रस्ताव विभागातून प्रमुख अभियंता यांच्या मंजुरीसाठी पाठवण्यात आला आहे.

मात्र, एनजीओच्या कामगारांचा नालेसफाईच्या कामातील तोकडा अनुभव, नाले सफाईसाठी लागणारी यंत्रणा आणि गाळ कुठे टाकणार हा नेहमीचा प्रश्न कसा सुटणार? असा पेच निर्माण झाला आहे.


न्नालेसफाई बंद
पालिकेच्या एफ उत्तर विभागात नालेसफाई करण्यास कंत्राटदार आलेले नाहीत. त्यामुळे येथील नालेसफाईचे काम ठप्प झाले आहेत. या विभागात १४ मोठे नाले असून, या नाल्यांच्या सफाईसाठी २० एनजीओची यादी निश्चित करण्यात आली आहे. या वॉर्डमधील छोटे नाले साफ झाल्यावर गाळ रस्त्यावर किंवा नाल्यांच्या तोंडावर टाकला जात आहे.


पावसाळ्यापूर्वी ६० टक्के, पावसाळ्यात २० टक्के तर पावसाळ्यानंतर २० टक्के नाल्यांची सफाई करण्यात येते. मात्र, नालेसफाई घोटाळ्यात दोषी ठेकेदारांवर कडक कारवाई झाल्यामुळे नवीन ठेकेदार पुढे येण्यास तयार नव्हते, तसेच गाळ टाकण्यासाठी जागा मिळत नसल्याने ठेकेदारांकडून थंड प्रतिसाद मिळाला.
त्यामुळे पावसाळ्यापूर्व कामांसाठी पालिका प्रशासनाने सर्व सहायक आयुक्तांना विभाग स्तरावरील कामगार व बिगर शासकीय संस्थांमार्फत छोट्या नाल्याच्या सफाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार, विभाग पातळीवर मोठ्या पर्जन्य जलवाहिन्यांची कामे १ एप्रिलपासून तर छोट्या नाल्यांची कामे ७ एप्रिलपासून सुरू झाली.


नगरसेवकांची तक्रार

दक्षिण मध्य मुंबईत नाल्यांच्या सफाईला फटका बसल्याने येथील नगरसेवक नाराज आहेत. या विभागांमध्ये सखल भाग अधिक असल्याने, नाले साफ न झाल्यास या विभागांमध्ये पाणी तुंबण्याची दात शक्यता आहे. त्यामुळे यावर लवकर तोडगा काढा, असे गाऱ्हाणे घेऊन नगरसेवक पालिका मुख्यालयात धडकू लागले आहेत. अँटॉप हिलचे काँग्रेसचे नगरसेवक सुफियान वणू यांनी आपल्या वॉर्डमधील ही समस्या मांडून लवकरात लवकर यात लक्ष घालण्याची विनंती काँग्रेसचे गटनेते व विरोधी पक्षनेते रवी राजा यांना आज केली.


या विभागांना फटका
नालेसफाई वेळेवर न झाल्यास सायन, वडाळा, माटुंगा, दादर, माहीम, प्रभादेवी, परळ, अँटॉप हिल, करीरोड असे दक्षिण मध्य मुंबईतील भागांमध्ये नाले तुंबून, हा परिसर पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची भीती विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी व्यक्त केली.

दोन वर्षांपूर्वी नालेसफाईच्या कामाचे कंत्राट पालिकेने दिले होते. मात्र, यात दीडशे कोटींचा घोटाळा झाल्यानंतर, प्रशासनाने ठेकेदारांच्या मुसक्या आवळल्या आहेत.

विरोधक जाब विचारणार
नालेसफाई होत नसल्याने नगरसेवक हैराण आहेत. प्रभागातील जागरूक रहिवाशी रोज येऊन जाब विचारात असल्याने, नगरसेवक मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे या दिरंगाईचा जाब प्रशासनाला विचारणार असल्याचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी सांगितले. उद्या स्थायी समितीच्या
बैठकीत नालेसफाईच्या मुद्द्यावर वादळी चर्चा होण्याचे संकेत त्यांनी दिले आहेत.

Web Title: Nalasefai jam in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.