नालेसफाईचे काम कधीच पूर्ण होत नाही - उद्धव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2017 07:52 PM2017-05-09T19:52:14+5:302017-05-09T20:12:08+5:30
नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 9 - पावसाळ्याला सुरुवात झाली की मुंबईत तुंबणाऱ्या पाण्यामुळे नालेसफाईचा प्रश्न ऐरणीवर येतो. मात्र नालेसफाईचे काम हे कधीच पूर्ण होत नाही, अशी कबुली शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज दिली. मुंबईत पावसाळ्यापूर्वी सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामांची उद्धव ठाकरे यांनी आज पाहणी केली. त्यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना ""नालेसफाई कधीच पूर्ण होत नसते. नालेसफाई पावसाच्या आधी आणि पावसाच्या नंतरही सुरूच असते. त्यामुळे नालेसफाई पूर्ण हा शब्द प्रयोग चुकीचा आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. पावसाळ्यात पाणी तुंबू न देणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी नालेसफाईचं काम पूर्ण होईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.
उद्धव ठाकरे म्हणाले, "गेली अनेक वर्षे मी नालेसफाईची पहाणी मी करतोय. दरवेळी मला प्रश्नं विचारला जातो की, निवडणुकीच्या तोंडावर नालेसफाई ची पाहणी करता का?, आता निवडणुका तर होऊन गेलेल्या आहेत. माझं कर्तव्य म्हणून मी ही पाहणी करतोय. ही पाहणी करताना अनेक ठिकाणी सुधारणा झालेल्या आहेत. नाल्यांचे रुंदीकरण झालेलं आहे. याही वर्षी नालेसफाईचे काम सुरू आहे. किती टक्के सफाई झाली या प्रश्नात मला इंटरेस्ट नाही. मुळात पाणी तुंबू न देणे याकडे महापालिकेचं लक्ष आहे. गेल्या वर्षी पाणी तुंबले नाही. यावेळी ही माहापालिका दक्ष आहे. कुठे ही पाणी तुंबणार नाही याची दक्षता महापालिका घेणार आहे,"
नालेसफाईत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप निवडणुकीच्या वेळी प्रचारात केला गेला. पण, भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झाले नाही. केवळ निवडणुकीपुरते हे आरोप झाले, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला. नालेसफाईच्या पाहणी दौऱ्यात उद्धव ठाकरे यांच्यासोबत मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते.