निविदा प्रक्रियेत अडकली नालेसफाई

By admin | Published: May 16, 2016 01:25 AM2016-05-16T01:25:40+5:302016-05-16T01:25:40+5:30

पावसाळ्यात नाले तुंबून रहिवाशी क्षेत्रात पाणी घुसण्याची शक्यता आहे. महापालिकेला जाग येणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे

Nalcea caught in the tender process | निविदा प्रक्रियेत अडकली नालेसफाई

निविदा प्रक्रियेत अडकली नालेसफाई

Next

पिंपरी : पावसाळा तोंडावर आला असला, तरी अद्यापही पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने नालेसफाईचे काम सुरू केलेले नाही. निविदा प्रक्रियेत नालेसफाई अडकली आहे. वेळेवर नालेसफाई झाली नाही, तर ऐन पावसाळ्यात नाले तुंबून रहिवाशी क्षेत्रात पाणी घुसण्याची शक्यता आहे. महापालिकेला जाग येणार कधी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दर वर्षी पावसाळ्याच्या तोंडावर नालेसफाई केली जाते. यंदा पावसाळा जवळ आला, तरी महापालिकेचे नालेसफाईचे नियोजन झाले नसल्याचे दिसून येत आहे. अधिकारी आणि ठेकेदार यांच्यातील समन्वयाअभावी नालेसफाई रखडली आहे. पिंपरी-चिंचवड शहरातून पवना, इंद्रायणी, मुळा या नद्या जातात. नाल्याद्वारे या नद्यांमध्ये सांडपाणी प्रक्रियेशिवाय सोडले जाते. नाल्यांमध्ये प्लॅस्टिकचे कागद, पिशव्या, बाटल्या, मोठ्या प्रमाणावर कचरा दिसून येत आहे. तसेच नाल्याच्या प्रवाहात काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गवत वाढल्याने सांडपाण्यात अडथळा निर्माण झाला आहे. महापालिकेचे एकूण सहा
प्रभाग असून, छोट्या नाल्याच्या सफाईचे नियोजन केले आहे. मात्र, मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम सुरू झालेले नाही. त्याचे केवळ नियोजन केले आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून छोट्या नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मोठ्या नाल्यांच्या सफाईचे काम ठेकेदारी पद्धतीने केले जाते. याबाबतची निविदा प्रक्रिया मार्चपर्यंत पूर्ण होऊन मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात नालेसफाईचे काम पूर्ण होत असते. मात्र, मे महिन्याचा दुसरा आठवडा सुरू झाला, तरी अद्यापही निविदा प्रक्रियेचे काम पूर्ण झालेले नाही. निविदेला प्रतिसाद न मिळाल्याने पुनर्निविदा काढण्यात आली आहे. सहापैकी दोन प्रभागांच्या कामाच्या निविदेचे काम सुरू आहे.
अवकाळी पाऊस सुरू झाला आहे, तसेच वेधशाळेने या वर्षी मॉन्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे. मात्र, महापालिका अजूनही नालेसफाईबाबत ढिम्म असल्याचे दिसून येत आहे.
मे महिन्याच्या अखेरीपर्यंत नाले सफाईचे नियोजन आरोग्य विभागाने केले आहे. एक जूनपूर्वी शहरातील लहान आणि मोठ्या नाल्यांची
सफाई होईल, असे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
नदीत मिसळतात २३ नाले
पवना नदीत रावेतपासून दापोडीपर्यंत २३ नाले सोडलेले आहेत. त्यात मामुर्डी, निवृत्ती लॉन रावेत, रावेत, पुनावळे, सृष्टी नर्सरी, वाल्हेकरवाडी, थेरगाव स्मशानभूमी, थेरगाव नाला, चिंचवड एसकेएफ कंपनीतून जाणारा नाला, भाटनगर पिंपरी, मोरवाडी, डिलक्स टॉकीज नाला, तपोवन, रहाटणी, पिंपळे सौदागर एक आणि दोन, कलासागर, नाशिक फाटा, सॅन्डविक कॉलनी, फुगेवाडी, आनंद पार्क दापोडी, इंद्रप्रस्थ, हॅरिस ब्रिज दापोडी हे प्रमुख नाले आहेत. तर इंद्रायणी नदीत सात नाले जोडले आहेत. आयटी पार्क तळवडे, तळवडे शेलारवाडी, काळभैरव नाला, कुदळवाडी चिखली नाला, सस्ते वस्ती, ताजणेमळा हे नाले आहेत. तर मुळा नदीत तीन नाले जोडले आहेत. बोपखेल, सावतामाळी, कस्पटे वस्ती वाकड नाला आहेत. या प्रमुख नाल्यांची सफाई झालेली नाही.
दोन दिवसांत निविदा
याविषयी आरोग्य विभागाचे सहायक आयुक्त मिनीनाथ दंडवते म्हणाले, ‘‘नालेसफाईविषयी आयुक्तांनी आढावा बैठक घेतली आहे. त्यानुसार विभागाने कामाचे नियोजन केले आहे. उपलब्ध कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून लहान नाल्यांची सफाई सुरू केली आहे. मोठ्या नाल्यांच्या सफाईची निविदा काढली आहे. येत्या दोन दिवसांत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन मोठ्या नाल्यांची सफाई सुरू केली जाईल. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याचे नियोजन आहे.’’

Web Title: Nalcea caught in the tender process

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.