नामदेवांची अभंगसंपदा
By admin | Published: April 2, 2015 03:13 AM2015-04-02T03:13:19+5:302015-04-02T03:13:19+5:30
सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण
सातशे वर्षांपूर्वी भागवत धर्माची पताका घेऊन संत नामदेवांनी पंजाब प्रांतात पाऊल ठेवले. संत ज्ञानेश्वरांच्या समाधीनंतर म्हणजे साधारण १२९६ नंतर पंजाबात प्रबोधनाची पताका रोवली. घुमान हे गाव त्यांनीच वसवले, असेही मानले जाते. शीखांच्या पवित्र ‘गुरुग्रंथसाहिब’मध्ये संत नामदेवांच्या अनेक रचना आहेत. त्यांचे ६२ अभंग ग्रंथात समाविष्ट करण्यात आले आहेत. नामदेवांचे अभंग मराठीत असले तरी ग्रंथसाहिबमध्ये ते पंजाबीमिश्रित मराठी, संस्कृत भाषांतरित आहेत. अन्य सहा गुरूंच्या रचनांबरोबर विविध भागांत समाविष्ट करण्यात आले आहेत. उत्कट भावभक्ती आणि उदात्त विचार असलेली अभंगगाथा नामदेवांनी हिंदीमध्येही शब्दबद्ध केल्याने ते सर्वांना प्रेरक ठरली आहे. ‘ग्रंथसाहिबा’तील गुरुमुखीमध्ये लिखित व पंजाबी भाषेत रचलेल्या 'शबद' रचनांचे वाचन करत असताना ईश्वराच्या अगाध लीलांचे वर्णन करणाऱ्या संत नामदेव रचित सुंदर रचना वाचणे हा खरोखर प्रासादिक अनुभव आहे.
ईश्वराची महती अवर्णनीय आहे आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवालाही सुरनर मुनिजनांच्या तत्त्वाचा पार लागलेला नाही, याचे स्पष्टीकरण देताना नामदेव म्हणतात-
केते पच गये हैं, कोटी ब्रम्हा। सूरनर मुनिजन पार न पावै।।
तजू अभिमान कर निरमल करमा। नामदेव के स्वामी अंतरयामा।
अगम अगाध हे तुमरी महिमा।। छीपेके घरि जनमु दैला,
गुरु उपदेसू भैला। संतनके परसादि, नामा हरि भेटुला।।
ही रचना उघड उघड मराठी वळणाची आहेच; मला शिंपी कुळात जन्म मिळाला, नव्हे, तो ईश्वराने दिला; पण गुरुपदेश झाला आणि मी पावन झालो. जात-जमात, पंथ, प्रदेश यांच्या पलीकडे पोहोचलो. हे सारे संतसहवासातून घडले. (भावार्थ)
‘नामदेव देके गुरु शिखावे खेचरी मुद्रा गाई,
प्रणवत नामा परम ततरे, सतिगुरू निकटी बताईला,
खेचर भुचर तुलसी माला, गुरु प्रसादी पाइआ।।
प्रभूची महती असामान्य आहे, असे सांगत सदगुरूविषयींचा पूज्यभाव नामदेवांनी या अभंगातून मांडला आहे.
(लेखक ज्येष्ठ इतिहास अभ्यासक आहेत.)