शहिदांच्या कुटुंबीयांसाठी अक्षयच्या नावे पैसे जमा करण्यासाठी फिरणारा "तो" मेसेज बनावट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2017 02:03 PM2017-07-19T14:03:01+5:302017-07-19T14:34:35+5:30
बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या नावे व्हाट्सअॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 19 - बॉलिवूड खिलाडी अक्षय कुमारच्या नावे व्हाट्सअॅपवर एक मेसेज प्रचंड व्हायरल होत आहे. या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, केंद्र सरकारने लष्कराला मजबूत करण्यासाठी आणि शहिद जवानांच्या मदतीसाठी एक बँक खातं खोललं आहे, ज्यामध्ये तुम्ही एक रुपयापासून ते आपल्याला शक्य तितकी रक्कम जमा करु शकता. सोबतच हा एक मास्टरस्ट्रोक असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
आणखी वाचा
जर तुम्हाला व्हाट्सअॅपवर असा एखादा मेसेज आला असेल, तर तुमच्या माहितीसाठी हा मेसेज पुर्णपणे बनावट आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेता अक्षय कुमार फक्त भारत सरकारची वेबसाईच bharatkeveer.gov.in शी जोडला गेला आहे. तसंच अक्षय कुमारने अशा प्रकारे कोणत्याही बँक खात्यात पैसे जमा करण्याचं आवाहन केलेलं नाही.
या मेसेजमध्ये सांगण्यात आलं आहे की, "भारताची लोकसंख्या 130 कोटी आहे. यामधील 70 टक्के लोकांनी जरी फक्त एक रुपया निधीत जमा केला तर एका दिवसात 100 कोटी रुपये जमा होतील. 30 दिवसांत 3000 कोटी आणि एका वर्षात 36,000 कोटी जमा होतील. 36 हजार कोटी रुपये तर पाकिस्तानचं सुरक्षा बजेटही नाही. आपण सर्वजण दिवसाला 100 किंवा 1000 रुपये असेच विनाकारण खर्च करुन टाकतो, पण जर आपण सर्वांनी एक रुपया लष्कराला दिला तर भारत खरोखर एर सुपर पावर देश होईल. तुमचा हा एक रुपया थेट संरक्षण मंत्रालयाच्या सैनिक सहाय्यता तसंच युद्ध अपघात निधीत जमा होईल. जो सैन्य सामग्री आणि लष्कराच्या जवानांसाठी कामी येईल".
अक्षय कुमारने काही दिवसांपुर्वी सुकमा नक्षली हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांना मदत करण्याचं आवाहन केलं होतं. अक्षयने आपल्या ऑडिओ मेसेजमध्ये सांगितलं होतं की, "सुकमा हल्ल्यात सीआयरपीएफच्या बहादूर जवानांनी देशासाठी आपला प्राण दिला आहे. माझी तुम्हा सर्वांना हा जोडून विनंती आहे की, जर या शहिदांना तुम्हाला खरंच श्रद्धांजली वाहायची असेल तर भारत सरकारच्या bharatkeveer.gov.in या वेबसाईटवर जाऊन तुम्ही तुमचं योगदान द्या. शहिदांच्या कुटुंबीयांना या दुखा:च्या वेळी आपण एकटे नाही आहोत याची जाणीव करुन द्या. त्यांच्यासोबत उभे राहा".