कोर्सेसच्या नावाखाली जवानांची गळचेपी
By admin | Published: April 25, 2016 05:34 AM2016-04-25T05:34:58+5:302016-04-25T05:34:58+5:30
एसआरपीएफ जवानांना नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्सेस करायला लागत असल्याचे समोर येत आहे.
मनीषा म्हात्रे,
मुंबई-एसआरपीएफ जवानांना नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पूर्ण करूनदेखील कामादरम्यान प्रत्येकी एक ते दोन महिने कालावधीचे २८ ते ३२ कोर्सेस करायला लागत असल्याचे समोर येत आहे. नऊ महिन्यांत जे शिकवले जाते, त्याचाच अधिकांश भाग या कोर्सेसमध्ये असतो. तरीही हे कोर्सेस बळजबरीने त्यांच्याकडून करून घेतले जातात. याचा परिणाम त्यांच्या साप्ताहिक सुट्ट्यांबरोबर जिल्हा बदलीवरही परिणाम होत आहे.
पुण्यातील दौंड येथे राज्य राखीव पोलीस दलाचे एकमेव नानवीज प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रातून जवानांचे नऊ महिन्यांचे खडतर प्रशिक्षण पार पडते. ‘चलना मना है सिर्फ दौंडना है’च्या नावाखाली सकाळी ५ वाजल्यापासून सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू असणाऱ्या प्रशिक्षणादरम्यान जवानांना क्षणाचीही विश्रांती मिळत नाही. जर मैदानात कोणी चालताना आढळला, तर त्याला दंडासाठी तयार राहावे लागते. दुपारी १ ते २ या वेळेत जेवणाची वेळ मात्र प्रशिक्षणादरम्यानचे साहित्य जमा करेपर्यंत ती वेळही निघून जाते. अशात केवळ निम्मेच जवान जेवण घेतात. मात्र, तरीदेखील सगळेच जवान जेवले असल्याची नोंद त्यांच्या दफ्तरी होते. येथील जेवणाचा अंदाज ठेकेदारांसह कर्मचाऱ्यांनाही असल्याने जवानांच्या जेवणाच्या कमिशनवर वरिष्ठांचा डोळा असतो.
अशा प्रकारे नऊ महिन्यांच्या प्रशिक्षणानंतरदेखील विविध गटांत गेलेल्या जवानांना २८ ते ३२ कोर्सेससाठी पळावे लागते. यामध्ये क्वीक रिस्पॉन्स टीम (क्युआरटी), कमांडो, नवचैतन्य, एकेएसएलआर, ग्रेनेड, एसआरपीएलआरपी, जेएलसी, ड्रील, सेक्शन कमांड, एफसी, रोड ओपनिंग, एटीसी, शारीरिक शिक्षण, राइट कंट्रोल, जंगलवार, हत्यार हाताळणे, सॉफ्ट स्कीलसारखे प्रत्येकी १ ते २ महिन्यांचे कोर्सेस त्यांना करणे भाग पडते. मुळात या कोर्सेसचा अभ्यास नऊ महिन्यांच्या खडतर प्रशिक्षणादरम्यान शिकवला जातो. तरीदेखील या कोर्सेसचा भडिमार या जवानांना सहन करावा लागतो. गेल्या दोन वर्षांपासून हे कोर्सेसच पुणे येथील दौंड भागातील नानवीज प्रशिक्षण केंद्रात पार पडत आहेत. त्यामुळे प्रशिक्षणाच्या नावाखाली केवळ जवानांना पळवूनच त्यांचा मानसिक छळ केला जात असल्याचे जवानांचे म्हणणे आहे. तत्कालीन विशेष पोलीस उपमहानिरीक्षक संजय पाण्डेय यांच्या पाठपुराव्यामुळे हे कोर्सेस बंद करण्यात आले होते. दोन वर्षे हे कोर्सेस बंद राहिले. मात्र, त्यांनी पदभार सोडल्यानंतर पुन्हा हे कोर्सेस सुरू झाल्याचे उच्चपदस्थ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. मुळात या जवानांना लांब न पाठवता, त्यांच्या गटाजवळील परिसरातच प्रशिक्षण देण्याची मागणीही त्यांनी केली होती.
शासनाच्या नियमानुसार, एसआरपीएफमध्ये १० वर्षे सेवा केल्यानंतर तो जवान जिल्हा बदली अथवा आयुक्तालय बदलीसाठी पात्र होतो. असे असतानाही या जवानांना कोर्सेसच्या नावाखाली थांबवून ठेवतात. या कोर्सेससाठी वयाचे बंधन नसल्याने निवृत्तीच्या वाटेवर पोहोचलेल्या जवानांकडून प्रशिक्षण केंद्रावर सेवेचा अंतिम प्रवास झिजवण्यास भाग पडल्याची व्यथा धुळ्यातील जवानाने मांडली.
पुणे गटातील १३३ जवानांच्या जिल्हा बदलीचे आदेश असतानाही केवळ प्रशिक्षणाच्या नावाखाली त्यांना अद्याप सोडण्यात आलेले नाही. १ नोव्हेंबर २०१५ रोजी त्यांची तत्काळ बदली करण्याचे आदेश देण्यात आले होते. असे असताना २० एप्रिल रोजी या जवानांना तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून कायदा, तपास कामकाज व पोलीस ठाण्याच्या कामकाजाचे एक महिन्याचे प्रशिक्षण पार पडणे आवश्यक असल्याचे पत्र राज्य राखीव पोलीस बल पुण्याचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. सुरेश कुमार यांनी काढले. त्यामुळे सेवेचा खडतर प्रवास पार पाडून बदलीच्या प्रतीक्षेत असलेल्या या जवानांवर या प्रशिक्षणामुळे पुन्हा कोंडी झाली. हीच परिस्थिती राज्यातील १६ गटांमध्ये आहे. मात्र, त्यांच्या समस्यांकडे कुणालाही लक्ष देण्यास वेळ नसल्याने, दिवसेंदिवस या जवानांवर ताण वाढत आहे. (उत्तरार्ध)
>जवान बनतोय माथाडी आणि भाजीविक्रेता
प्रशिक्षणाच्या नावाखाली या जवानांकडून माथाडीचे काम करून घेतले जातात. तर काही ठिकाणी त्यांना भाजीविक्रीचे काम करणे भाग पडते. मुळात या पूर्वीही गडचिरोलीसारख्या परिसरात या जवानांकडून भिंत बांधण्याचे काम करून घेतले जात होते. याबाबत सोशल मीडियावरून आवाज उठताच पाण्डेय यांनी बंदी आणली होती. त्यात श्रमदानाच्या नावाखाली या जवानांना ४ ते ५ तास राबवून घेतले जाते. त्यात डायरीमध्ये मात्र, १५ ते २० मिनिटांची नोंद केली जात असल्याची माहिती गडचिरोलीतील जवानाने ‘लोकमत’ला दिली.
>कोर्सेसमुळेच जवानाचा बळी
मूळचा लातूर येथील रहिवासी असलेला सतीश गुंडरे हा हिंगोली गटातून कोर्ससाठी नानवीज प्रशिक्षण केंद्र येथे आला होता. या कोर्सदरम्यान १० किमी धावण्याच्या प्रशिक्षणादरम्यान तत्काळ उपचार न मिळाल्याने, त्याचा १९ एप्रिल रोजी दुर्दैवी मृत्यू झाला. त्यात येत्या २७ तारखेला या जवानाचे लग्न होते. मांडव सजला असताना त्याचा मृतदेह दारात आल्याने गुंडरे कुटुंबीयांवर शोककळा पसरली. त्यामुळे आणखी किती जणांच्या बळीची प्रशासन वाट पाहतेय, असा सवालही गुंडरे कुटुंबीयांकडून उपस्थित करण्यात येत आहे.