दाउद, छोटा शकीलच्या नावे महिलेला धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 02:34 AM2017-12-20T02:34:33+5:302017-12-20T02:34:53+5:30
अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमचच्या नावाखाली मुंबईच्या व्यावसायिक महिलेला १ कोटीसाठी धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरिकुमार यादव (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाउद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमचच्या नावाखाली मुंबईच्या व्यावसायिक महिलेला १ कोटीसाठी धमकावणा-याला दिल्लीतून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. हरिकुमार यादव (३०) असे अटक आरोपीचे नाव आहे. मुंबईच्या खंडणीविरोधी पथकाने ही कारवाई केली आहे.
यादव हा नवी दिल्लीच्या नगलोई विभागातील रहिवासी आहे. खार परिसरात तक्रारदार महिला राहण्यास असून त्यांचा गारमेंटचा व्यवसाय आहे. तसेच त्या सामाजिक कार्यकर्त्या आहेत. आॅक्टोबर २०१७ पासून त्यांना अनोळखी मोबाइल क्रमांकावरून धमकावण्यास सुरुवात झाली होती. बिग बॉसमधून बाहेर पडलेल्या जुबेर खानला मदत केली म्हणून त्यांना धमकावणे सुरू असल्याचा या महिलेचा आरोप आहे.
यादवने कराचीमधून बोलत असल्याचे सांगून त्यांना धमकावण्यास सुरुवात केली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमच यांचा साथीदार असल्याचे सांगून त्याने १ कोटीची मागणी केली. महिलेच्या तक्रारीवरून खार पोलिसांनी या प्रकरणी ३० नोव्हेंबर रोजी खंडणीचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. पुढे तो तपासासाठी खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग करण्यात आला.
खंडणीविरोधी पथकाने कॉल रेकॉर्ड तपासले तेव्हा कॉल नवी दिल्लीतून आल्याचे लक्षात आले. त्यानुसार तपास पथकाने सोमवारी नवी दिल्लीतून यादवला बेड्या ठोकल्या आहेत. त्याच्याकडे या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.