‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव

By Admin | Published: June 8, 2016 04:49 AM2016-06-08T04:49:15+5:302016-06-08T04:49:15+5:30

राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले

Name of Mahatma Phule to 'Jivandarai' | ‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव

‘जीवनदायी’ला महात्मा फुले यांचे नाव

googlenewsNext


मुंबई : राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचे नाव राज्य सरकारने बदलले असून, आता ही योजना महात्मा फुले जन आरोग्य योजना नावाने राबविण्यात येणार आहे. या योजनेला शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव होता. मात्र, त्यांच्या नावे अपघात विमा योजना सुरू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.
जीवनदायी योजनेला बाळासाहेबांचे नाव देण्याचे विचाराधीन होते. तसे सूतोवाच आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले होते. मात्र, राजीव गांधींचे नाव बदलून बाळासाहेबांचे नाव दिले, तर राजकीय गदारोळ होईल म्हणून महात्मा फुलेंचे नाव देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे म्हटले जात आहे. या योजनेची मुदत ३१ आॅक्टोबरला संपणार आहे. महात्मा जोतिबा फुले यांच्या १२५ व्या पुण्यतिथीचे यंदाचे वर्ष असून त्यानिमित्त हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती डॉ. सावंत यांनी दिली. विमा संरक्षण रकमेत वाढ केली असून दरवर्षी प्रतिकुटुंब दीड लाख रु पयांऐवजी आता नव्या योजनेत दोन लाख रुपयांची मर्यादा करण्यात आली आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठीची (किडनी ट्रान्सप्लांट) मर्यादा अडीच लाख रुपयांवरून तीन लाख रुपये करण्यात येणार आहे. समाविष्ट आजारांची (प्रोसिजर्स) संख्या ९७१ वरून ११०० एवढी करण्यात आली आहे. स्वाईन फ्ल्यू, डेंग्यू वरील उपचाराचा खर्च तसेच सिकलसेल, अ‍ॅनिमिया, लहान मुलांचे आजार, वार्धक्याचे आजार यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील २ कोटी २६ लाख दारिद्रय रेषेखालील व दारिद्रय रेषेवरील केशरी शिधा पत्रिकाधारक कुटुंब, शासकीय आश्रमशाळा, अनाथालय, वृध्दाश्रम, १४ शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातील शेतकरी तसेच पत्रकारांचादेखील समावेश या नव्या योजनेत करण्यात आला
आहे. 
>अपघात विमा योजना
राज्यामध्ये रस्ते अपघातात जखमी होणाऱ्या रु ग्णांवर पहिल्या ‘गोल्डन अवर’मध्ये तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत रस्ते अपघातातील जखमींवर पहिले तीन दिवस मोफत उपचार करण्यात येतील.
त्यानंतर त्या जखमींच्या रुग्णांशी संपर्क साधून त्यांना आवश्यकता वाटल्यास शासकीय रुग्णालय, खासगी किंवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या रु ग्णालयात दाखल केले जाईल. राज्यातील २०० ट्रॉमाकेअर रु ग्णालये या योजनेत सहभागी केले जातील. या योजनेतील खर्चाची मर्यादा ३० हजार रुपये एवढी आहे, असेही डॉ. सावंत यांनी सांगितले.

Web Title: Name of Mahatma Phule to 'Jivandarai'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.