‘हेक्स वर्ल्ड’चा भूखंड नावावर करा
By admin | Published: January 23, 2017 04:21 AM2017-01-23T04:21:34+5:302017-01-23T04:21:34+5:30
खारघरमधील देविशा इन्फ्रास्ट्रचर या छगन भुजबळ यांच्या मालकीच्या कंपनीने दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडून बुकिंग घेऊन, हेक्स सिटी
वैभव गायकर / पनवेल
खारघरमधील देविशा इन्फ्रास्ट्रचर या छगन भुजबळ यांच्या मालकीच्या कंपनीने दोन हजारांपेक्षा जास्त ग्राहकांकडून बुकिंग घेऊन, हेक्स सिटी हा प्रकल्प उभारायला सुरुवात केली होती. मात्र, भुजबळ यांना अटक झाल्यानंतर हा प्रकल्प रखडला. हे पैसे परत मिळावेत, म्हणून ग्राहकांनी एकत्र येऊन हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून, कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. त्याकरिताच ग्राहकांनी रविवारी बैठक घेतली. यात संबंधित भूखंड हा ग्राहकांनी स्थापन केलेल्या संस्थेला हस्तांतरण करावा, अशी मागणी करण्यात आली असून, याबाबतचे पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आले आहे.
२०१० पासून संबंधित कंपनीकडून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळवण्यासाठी चालढकल होत असल्याने, या प्रकल्पात बुकिंग केलेल्या ग्राहकांनी रविवारी एकत्र येऊन निदर्शने केली.
खारघरमधील भूखंड क्र मांक ९१, ९४, ९५, १००, १०२, १०३ वर हा प्रकल्प उभारला जाणार होता. मात्र, छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात अडकल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली आणि त्यांच्या कंपनीशी संबंधित अनेक प्रकल्पांना सील ठोकण्यात आले. या प्रकल्पामध्ये खारघरच्या हेक्स सिटी प्रकल्पाचाही सहभाग आहे. या प्रकल्पात जवळपास २,३४४ ग्राहकांनी घरांचे बुकिंग केले असून, त्यांचे सर्वांचे मिळून कोट्यवधी रुपये या प्रकल्पात गुंतले आहेत. प्रकल्पात घर बुक करणारे बहुतांश मध्यमवर्गीय असून, कर्ज काढून, आयुष्याची पुंजी अनेकांनी या ठिकाणी जमा केली आहे. हे पैसे परत मिळावेत, म्हणून ग्राहकांनी एकत्र येऊन हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनची स्थापना करून, कायदेशीर लढा देण्याचे ठरविले आहे. मागणी मान्य होत नाही, तोपर्यंत आम्ही कायदेशीर लढा देतच राहणार, अशी प्रतिक्रिया हेक्स वर्ल्ड वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष लालासाहेब लोमटे यांनी दिली. (प्रतिनिधी)