समृद्धी महामार्गाला जिजाऊंचे नाव द्यावे; संभाजी राजेंची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2019 08:20 PM2019-01-12T20:20:41+5:302019-01-12T20:29:39+5:30
मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे.
बुलडाणा - मुंबई आणि नागपूरला जोडणाऱ्या समृद्धी महामार्गाला राजमाता जिजाऊंचे नाव देण्यात यावे, अशी मागणी खासदार संभाजीराजे भोसले यांनी केली आहे. आज जिजाऊंच्या जन्मदिनानिमित्त सिंदखेड राजाया येथे आयोजित कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना संभाजी राजे यांनी ही मागणी केली. मुंबई आणि नागपूरला जोडणारा 800 किमी लांबीचा समृद्धी महामार्ग हा जिजाऊंच्या नावाने ओळखला गेला पाहिजे, असे ते म्हणाले.
दरम्यान, राजमाता जिजाऊंचा जन्मदिन आज सिंदखेड राजा येथे उत्साहात साजरा झाला. यावेळी मराठा सेवा संघ, जिजाऊंचे वंशज शिवाजी राजे, जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, नगर परिषद, जिल्हा परिषद, पंचायत समिती व महाराष्ट्र शासनाच्यावतीने १२ जानेवारी रोजी जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त जिजाऊ माँसाहेबांची महापूजा करुन जिजाऊंना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रमाता जिजाऊ माँ साहेब यांच्या जन्मस्थळ असलेल्या राजे लखुजीराव जाधव यांच्या राजवाड्यावर १२ जानेवारी रोजी सूर्योदयापासूनच महाराष्ट्रसह देशाच्या कानाकोपऱ्यातून माँ जिजाऊचरणी लीन होऊन माँ साहेब जिजांऊचे आशीर्वाद घेण्यासाठी जनसागर उसळला होता.
दरम्यान, राजमाता जिजाऊ यांच्या 421 व्या जन्मोत्सवानिमित्त सिंदखेडराजा येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलताना अभिनेते आणि शिवसेना नेते डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ''आपल्या घरातील जिजाऊंचा सन्मान करा. प्रत्येक घरात जिजाऊ जन्माला आल्या, तर शिवबा जन्माला येईल. प्रत्येकानं आपल्या मनातला शिवविचार जागा ठेवण्याची गरज आहे.''