शाळेने दिलेल्या बाळकडूमुळेच नावलौकिक - अजित वाडेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2017 02:05 AM2017-03-04T02:05:49+5:302017-03-04T02:05:49+5:30
ज्या शाळेने मला क्रिकेटचे बाळकडू दिले त्या छबिलदास शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही
मुंबई : जगाच्या क्रिकेट इतिहासात माझा कितीही नावलौकिक झाला असला तरी, ज्या शाळेने मला क्रिकेटचे बाळकडू दिले त्या छबिलदास शाळेचे ऋण मी कधीही विसरू शकत नाही. या शाळेमुळेच मी मोठा झालो, असे कृतज्ञपूर्वक उद्गार भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार अजित वाडेकर यांनी काढले.
दादर विभागातील छबिलदास हायस्कूलच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षाचा शुभारंभ आणि नव्याने सुरू करण्यात आलेल्या सीबीएससी इंग्रजी अभ्यासक्रमाचा शुभारंभ क्रिकेटपटू व शाळेचे माजी विद्यार्थी अजित वाडकेर यांच्या हस्ते नुकताच शाळेच्या सभागृहात करण्यात आला. या वेळी, अध्यक्षस्थानी संस्थेचे उपकार्याध्यक्ष शैलेश साळवी होते, तर याप्रसंगी खासदार हुसेन दलवाई, बाळ सडवेलकर, संस्थापक अक्षीकरांचे नातू श्रीकृष्ण अक्षीकर उपस्थित होते.
अजित वाडेकर यांनी या वेळी शालेय जीवनातल्या अनेक आठवणी सांगून जागतिक स्तरावरील क्रिकेट स्पर्धेचा यशस्वी प्रवास उपस्थितांसमोर उलगडला. ते म्हणाले, या शाळेने मला क्रिकेट जीवनात यशस्वी होण्यासाठी खूपकाही शिकविले. त्यामुळे मी जगात कुठेही गेलो तरी शाळेच्या आठवणी प्रेरणा देत असतात. तर बाळ सडवलेकर म्हणाले की, इंग्रजी भाषा जरूर शिकले पाहिजे. पण ती शिकताना आपल्या मराठी मातृभाषेचा विसर पडता कामा नये हे त्यांनी अधोरेखित केले. (प्रतिनिधी)