शिशुविहारच्या नावाखाली मनमानी कारभार सुरूच
By Admin | Published: May 14, 2017 05:25 AM2017-05-14T05:25:16+5:302017-05-14T05:25:16+5:30
उत्तम दर्जाचे, चांगल्या शिक्षकांकडून शिक्षण मिळावे, म्हणून पालक चांगल्या शाळेची निवड करण्यासाठी सतर्क असतात.
पूजा दामले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उत्तम दर्जाचे, चांगल्या शिक्षकांकडून शिक्षण मिळावे, म्हणून पालक चांगल्या शाळेची निवड करण्यासाठी सतर्क असतात. पहिलीला प्रवेश घ्यायला गेल्यास, ‘इन हाउस अॅडमिशन’ फुल झाल्याने प्रवेश नाकारला जाईल, या भीतीने पूर्व प्राथमिकला प्रवेश घेण्यासाठी जिवाचा आटापिटा केला जातो. त्यासाठी पालक हजारो-लाखो रुपये मोजायला तयार असतात. प्रत्यक्षात मात्र, या शिशुविहार अथवा पूर्व प्राथमिक शाळांची नोंदणीच होत नसल्याने, राज्यासह मुंबईत पूर्व प्राथमिक शाळांच्या संस्थाचालकांचा अंदाधुंद मनमानी कारभार सध्या खुलेआमपणे सुरू आहे.
मुंबईत साधारण २ हजार ८०० पूर्व प्राथमिक शाळा आहेत. यातील बहुतांश शाळांचा कारभार मनमानी पद्धतीने सुरू आहे. या शाळांची महापालिका अथवा राज्य सरकारकडे कोणत्याही प्रकारची नोंद नाही. त्यामुळे या शाळांचा आकडा उपलब्ध नाही. गेल्या कित्येक वर्षांपासून शिक्षण संस्थाचालकच मनमानी कारभार करून, पूर्व प्राथमिक शाळा चालवत आहेत. यामुळे पालकांची पूर्व प्राथमिक शाळांमध्ये होणारी लूट, पालकांवर होणारा अन्याय यासंदर्भात ते कोणाकडेही दाद मागू शकत नाहीत. शिक्षण विभागाकडे तक्रार दाखल केल्यानंतरही कारवाई होण्याची शाश्वती नाही. कारण पूर्व प्राथमिक शाळांसाठी कायदा, नियमावलीच आजमितीला अस्तित्वात नाही.
शासनाच्या शाळेच्या व्याख्येनुसार, इयत्ता पहिलीपासून शाळा सुरू होते. परंतु आता वाढत्या शैक्षणिक स्पर्धेमुळे पालक प्ले गु्रप, नर्सरीत मुलांना प्रवेश घेऊन देतात. त्यासाठी जानेवारी, डिसेंबरपासूनच शाळांबाहेर रांगा लावतात.
पूर्व प्राथमिकची नोंदणीच केली जात नसल्याने, शिक्षण विभागाकडे या शाळांची कोणतीही अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. या शाळा किती जागेत असाव्यात, कोणत्या सुविधा शाळेत असाव्यात, किती शुल्क आकारावे, किती तास शाळा असावी, असे कोणतेच नियम या शाळांना नाहीत. त्यामुळे काही ठिकाणी चांगल्या शाळेत, तर दुसरीकडे एका खोलीतही पूर्व प्राथमिक शाळा सुरू आहेत. या शाळांविषयी अनेक तक्रारी शिक्षण विभागाकडे येत असतात, पण नोंदणी नसल्याने कारवाई करता येत नसल्याचे, एका शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर ‘लोकमत’ला सांगितले.
>४१८ प्राथमिक अनुदानित शाळा
मुंबई महापालिका क्षेत्रात इयत्ता पहिली ते चौथी या खासगी प्राथमिक अनुदानित शाळांची संख्या ४१८ आहे, तर विनाअनुदानित शाळांची संख्या ६७२ आहे. सर्वसाधारणपणे या सर्व शाळांमध्ये पूर्व प्राथमिकचे वर्ग सुरू आहेत, पण याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही.