नागपूरच्या पर्णिकाचे युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव
By admin | Published: October 17, 2014 01:05 AM2014-10-17T01:05:28+5:302014-10-17T01:05:28+5:30
भारताच्या पहिल्या रेकॉर्ड बुकच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नागपुरातील ९ वर्षाच्या पर्णिका ढेंगरे या बालिकेने विक्रम नोंदविला आहे. भटिंडा, पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत पर्णिकाने चक्रासनात १०० मीटर
गिनीज बुकमध्ये नाव नोंदणीसाठी पर्णिका ढेंगरेचे प्रयत्न
नागपूर : भारताच्या पहिल्या रेकॉर्ड बुकच्या दुसऱ्या आवृत्तीसाठी नागपुरातील ९ वर्षाच्या पर्णिका ढेंगरे या बालिकेने विक्रम नोंदविला आहे. भटिंडा, पंजाब येथे झालेल्या स्पर्धेत पर्णिकाने चक्रासनात १०० मीटर अंतर केवळ एक मिनिटात पार केले. पर्णिका चक्रासनात केवळ चालत नाही तर धावते. तिच्या या अनोख्या विक्रमासाठी युनिक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये तिचे नाव नोंदविण्यात आले असून नागपूरकरांची मान उंचावण्याचे कार्य तिने केले आहे.
पर्णिकाने चक्रासनात उलट दिशेने धावण्यात प्राविण्य प्राप्त केले आहे. असे प्राविण्य आतापर्यंत जगात कुणीही मिळविल्याची नोंद नाही. पर्णिका यानंतर गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदविण्याचा प्रयत्न करणार आहे. तिला चक्रासनात धावण्याचे प्राविण्य मिळविण्यासाठी तिचे गुरू गजानन लडी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या मार्गदर्शनानेच हे यश मिळाले असल्याची भावना पर्णिकाने व्यक्त केली आहे. इतक्या कमी वयात तिने मिळविलेले यश प्रशंसनीय आहे. पर्णिका व्ही. टी. कॉन्व्हेन्ट, अत्रे लेआऊटची विद्यार्थिनी असून ती चौथ्या वर्गात शिकत आहे. तिचे गुरु गजानन लडी यांनीही चक्रासनात त्यांचाच विक्रम मोडला आहे. ते शाब्बास इंडिया या मालिकेचे विजेते आहे. पोटावर ६० किलो वजन ठेवून एक मिनिट उभे राहण्याचा त्यांचा विक्रम आहे. पर्णिकाचे नाव यापूर्वी २०१३ साली इंडिया बुक आॅफ रेकॉर्डमध्ये नोंदविण्यात आले आहे. नियमित योगासने करण्याचा छंद पर्णिकाला आहे. विविध योगासन स्पर्धेत आतापर्यंत तिला अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)
चक्रासनात स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे
चक्रासनाच्या माध्यमातून संपूर्ण जगात मला स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करायची आहे. आतापर्यंत अनेक योगासन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळाला. गुरू गजानन लडी यांच्या मार्गदर्शनान हे यश मिळते आहे. जगात चक्रासनाच्या माध्यमातून माझे आणि देशाचे नाव उंच करण्यासाठी अधिक परिश्रम घेण्याची तयारी पर्णिकाने दर्शविली आहे.