बळीराजाच्या नावानं चांगभलं !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2016 03:29 AM2016-03-19T03:29:25+5:302016-03-19T03:29:25+5:30
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातल्या भाजपा सरकारनेदेखील शेतकऱ्यांचा कैवार घेत अर्थसंकल्पात २६ हजार कोटींची तरतूद करीत राजकीय हित साधले आहे.
- अतुल कुलकर्णी, मुंबई
केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पावलावर पाऊल टाकत राज्यातल्या भाजपा सरकारनेदेखील शेतकऱ्यांचा कैवार घेत अर्थसंकल्पात २६ हजार कोटींची तरतूद करीत राजकीय हित साधले आहे. ९,२८९ कोटींच्या तुटीचा अर्थसंकल्प मांडताना अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उत्पन्नाचे नवे कोणतेही मार्ग या अर्थसंकल्पातून समोर आणलेले नाहीत.
हे वर्ष ‘शेतकरी स्वाभिमान वर्ष’ म्हणून साजरे केले जाईल, असे जाहीर करीत भाजपाने आपली शहरी ओळख पुसून टाकण्यासाठी पावले टाकली आहेत. अर्थमंत्र्यांच्या दीड तासाच्या भाषणात ३0 मिनिटे शेतकरी आणि कृषी विभागासाठी केलेल्या योजना सांगण्यात गेली. यावरूनच भाजपा सरकारने आपले लक्ष्य ग्रामीण भागावर केंद्रित केल्याचे दिसून येते.
राष्ट्रवादीचे दिवंगत नेते आर.आर. पाटील यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणाऱ्या सभागृहासाठी ५ कोटींची तरतूद करताना ‘बाळासाहेब ठाकरे’ यांच्या नावे जाहीर केलेल्या योजनेसाठी मात्र फक्त १ कोटीची तरतूद करून भविष्यातल्या जवळिकीचे सूतोवाचही या अर्थसंकल्पातून केले आहे. करवाढीच्या किंवा करकपातीच्या पारंपरिक पद्धतीलाच पुढे नेण्याचे काम या अर्थसंकल्पाने केले असून राज्यावरील साडेतीन लाख कोटींचे कर्ज आणि नऊ हजार कोटींची तूट भरून कशी काढायची, याविषयी कोणतीही स्पष्टता अर्थसंकल्पात नाही. अनेक विभागांसाठी अत्यल्प तरतुदी केल्यामुळे त्या त्या विभागांचे मंत्रीही नाखूश असल्याचे चित्र आहे. रोजगार हमी योजनेचे ३,४७३ कोटी, दुष्काळ निवारणासाठीचे १,८५५ कोटी, विद्युत पंप वीज दर सवलतीचे ३,५00 कोटी आणि सिंचनासाठीचे ७,८५0 कोटी अशा विविध रकमा एकत्र करीत शेतकऱ्यांसाठीचे २६ हजार ८९१ कोटींचे पॅकेज बनवले गेले आहे.
२0१५ चा अर्थसंकल्प सादर करताना महसुली खर्च २ लाख १ हजार ९८८ कोटी गृहीत धरण्यात आला होता. मात्र, तो खर्च २ लाख ७ हजार ६११ कोटीपर्यंत गेला आहे. परिणामी वर्षाच्या सुरुवातीस ३,७५७ कोटी रुपये महसुली तुटीचा अर्थसंकल्प वर्ष संपताना ९,२८९ कोटीपर्यंत गेला आहे. दुष्काळामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यात आली. त्यामुळे ही तूट वाढल्याचे अर्थमंत्री मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.
अनावश्यक खर्चात बचत करून महसूल वसुली अधिक प्रभावीपणे करून ही तूट मर्यादित करण्याचा प्रयत्न असेल, असेही ते म्हणाले. या वर्षीचा अर्थसंकल्प ५६,९९७ कोटींचा आहे. त्यापैकी ६,७२५ कोटी रुपये अनुसूचित जाती उपयोजनेसाठी तर ५,३५७ कोटी आदिवासी उपयोजनेसाठी आणि ७,५६२ कोटी जिल्हा सर्वसाधारण योजनेसाठी निश्चित करण्यात आले आहेत.
अर्थसंकल्पाच्या प्रती मिळाल्याच नाहीत
अर्थसंकल्पाचे भाषण संपल्यानंतर त्याच्या प्रती तत्काळ माध्यमांना व आमदारांना उपलब्ध करून दिल्या जातात. ही वर्षानुवर्षांची प्रथापरंपरा या वर्षी खंडित झाली. माध्यमांना देण्यात येणाऱ्या प्रती घेऊन येणारा ट्रक वेळेवर पोहोचला नाही, असे कारण सांगितले गेले.
अनेक पातळ्यांवर घट : सरकारच्या उत्पन्नाला अनेक पातळ्यांवर घरघर लागली असून महसुली जमेमध्ये १५,३७८.४५ कोटींची तर सहायक अनुदाने व अंशदाने यात १0,५१८.६४ कोटींची घट झाली आहे. कर महसुलातील घट ३,९२0.९९ कोटींच्या घरात असून, खरे तर महसुलातील घट ९३८.८२ कोटी आहे. हीच अवस्था महसुली खर्चाच्या बाबतीत झाली आहे. महसुली खर्चात १७,१२४.२0 कोटींची घट झाली असून, त्यात सर्वसाधारण सेवा, सामाजिक सेवा, आर्थिक सेवा, अनुदान व अंशदान आदींचा समावेश आहे.
कठीण स्थितीत लोकांना स्वप्ने का दाखवता?
राज्याचा अर्थसंकल्प शेतकरीकेंद्रित असल्याचा दावा सरकारने केला असला तरी कर्जमाफीसंदर्भात सरकार काही तरी सूतोवाच करेल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली. कृषी क्षेत्राला २५ हजार कोटींची मदत देणार असल्याचे सांगितले. मात्र, कशी देणार या आकडेवारीचा तपशील दिला नाही. राज्याची तूट वाढते आहे. गेल्या अर्थसंकल्पातील निधी सरकारला खर्च करता आलेला नाही. महसुली उत्पन्न घटताना दिसते आहे. अशा स्थितीत हे सरकार लोकांना स्वप्ने का दाखवते आहे?
- राधाकृष्ण विखे पाटील, विरोधी पक्षनेते
शेतकऱ्यांसाठीच्या विविध योजनांकरिता
जाहीर केलेल्या २६ हजार कोटींचा हा हिशोब
अ.योजनानिधी
क्र. (कोटी रुपयांमध्ये)
अ)कृषीविषयक योजना३,३६0.३५
१)दुष्काळ१,८५५.00
२)पीक विमा१,८५५.00
३)जलयुक्त शिवार१000.00
४)शेततळे२000.00
५)अन्नसुरक्षा१,0३५.८३
६)मा.मा. तलाव0१५0.00
७)पांधण रस्ते१00.00
८)पंजाबराव व्याज११0.00
९)कडधान्य तेलबिया८0.00
१0)कृषी प्रक्रिया५0.00
११)कृषी मार्गदर्शन६0.00
१२)पशु महाविद्यालय१0.00
१३)कृषी महोत्सव६.८0
१४)रोहयो३,४७३.६७
१५)हवामान केंद्र१0७.00
१६)दुग्धव्यवसाय प्रकल्प१00.00
१७)शेती जोडधंदे५१.१३
१८)वळू माता१८.६१
१९)गोवंश रक्षा केंद्र३४.00
२0)विद्युतपंप वीज दर सवलत३५00
२१)कृषी वीजपंप अनुज्ञेय४८९
२२)ग्रामीण विद्युत बळकटीकरण४५0
२३)सोयाबीन कापूस १000
नुकसान भरपाई
एकूण१९,0४१.३९
ब)सिंचन७,८५0.00
एकूण (अ + ब)२६,८९१.३९