एल्फिन्स्टन स्थानकाचं "प्रभादेवी" असं नामकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2017 04:18 PM2017-07-04T16:18:25+5:302017-07-04T18:34:53+5:30

मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्टेशनचं नाव प्रभादेवी होणार आहे.

Named after Elphinston station's "Prabhadevi" | एल्फिन्स्टन स्थानकाचं "प्रभादेवी" असं नामकरण

एल्फिन्स्टन स्थानकाचं "प्रभादेवी" असं नामकरण

googlenewsNext
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 4 - मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झाल्यानंतर पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन रोड स्टेशनचं नाव प्रभादेवी होणार आहे.एल्फिन्स्टन रोड स्टेशनच्या नामकरणाला मंजुरी देण्यात आली आहे. एल्फिन्स्टनचं नाव बदलण्याचा प्रस्ताव सर्वप्रथम शिवसेना नेते दिवाकर रावते यांनी १९९१ मध्ये केंद्राकडे पाठवला होता. त्यामुळे एल्फिन्स्टन स्टेशनचं नाव आता प्रभादेवी होणार आहे. 
 
पश्चिम रेल्वेवरील स्थानकाला एलफिन्स्टन रोड हे नाव लॉर्ड एलफिन्स्टन यांच्या नावावरून देण्यात आले होते. ते 1853 ते 1860 या काळात "गव्हर्नर ऑफ बॉम्बे" होते. या स्थानकाचं नाव बदलण्याची मागणी बऱ्याच काळापासून होत होती. काही दिवसांपूर्वीच मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी टर्मिनसचं नामकरण छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस झालं आहे. मार्च 1996 मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस(व्हीटी) हे नाव बदलून "छत्रपती शिवाजी टर्मिनस" असं करण्यात आले होते. त्यानंतर आता 20 वर्षांनी पुन्हा या स्थानकाचे नाव बदलण्यात आलं. 
 
राज्य शासनाने या दोन्ही स्थानकांची सुधारीत नावे इंग्रजी व देवनागरी लिपीत राजपत्रात प्रसिद्ध करुन त्याप्रमाणे नावांमध्ये बदल करण्याची सूचना केंद्राने राज्याला केली होती. मुंबईतील रेल्वे स्थानकांना असलेली ब्रिटीशकालीन त्यातही ब्रिटीश अधिकाऱ्यांची नावे बदलण्याची मागणी राजकीय पक्षांकडून होत होती. या दोन स्थानकांशिवाय चर्नी रोड स्थानकाला गिरगाव स्थानक करी रोड स्थानकाचे नाव लालबाग, सँडहर्स्ट रोड स्थानकाचं नाव डोंगरी करण्याची मागणी आहे.
 
कोण होते एलफिन्स्ट्न-
 
पश्चिम रेल्वेवरील एलफिन्स्टन रोड स्टेशनचे नाव आता प्रभादेवी असे करण्यात आले आहे. १८६७ साली रेल्वेप्रवाशांच्या सेवेत आलेल्या या स्थानकाचे नाव मुंबईचे गव्हर्नर जॉन एलफिन्स्टन यांच्या स्मृतीसाठी देण्यात आले होते. माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हे जॉन एलफिन्स्टन यांचे काका होते. मुंबईच्या इतिहासामध्ये जॉन माल्कम, माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन, बार्टल फ्रिअर यांनी जसा आपल्या कामाचा ठसा उमटवला त्याप्रमाणे जॉन यांचेही एक महत्त्वाचे गव्हर्नर म्हणून नाव घेतले जाते.
जॉन एलफिन्स्टन यांच्या कारकिर्दीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये १८५७ चा उठाव झाला. या उठावाच्या काळामध्ये मुंबई प्रांतामध्ये विविध ठिकाणी झालेली लहानसहान बंडाची प्रकरणे त्यानी मिटवली. तर खुद्द मुंबईमध्येही बंडाची कुणकुण लागताच तीही तात्काळ शमवून टाकली होती. बंडाच्या योजनांमध्ये नसणारी एकी तसेच संघटीत प्रयत्नांचा अभाव असल्यामुळे मुंबईमध्ये बंड शमवण्यात कंपनीला सहज यश आले. इतकेच नाही तर मुंबईत विविध धर्माच्या लोकांनी कंपनी सरकारला पाठिंबा असणारी पत्रेच जॉन एलफिन्स्टनला सादर केली होती. त्यामुळे मुंबईमध्ये बंड शमवण्यात फारसा त्रास सहन करावा लागला नाही. १८५८साली राणी व्हिक्टोरियाने बंड शमवल्यानंतर काढलेला जाहीरनामा मुंबईतही वाचून दाखवला त्याप्रसंगीही जॉन एलफिन्स्टन हजर होते. १८५९ साली जॉन एलफिन्स्टन लंडनला पुन्हा निघून गेले आणि पुढच्याच वर्षी त्यांचा मृत्यू झाला.
रॉयल हॉर्स गार्डपासून कारकिर्दीला सुरुवात
२३ जून १८०७ रोजी जन्मलेल्या जॉन एलफिन्स्टननी १८२३ साली लष्करामध्ये प्रवेश केला. त्यावेळेस सर्वात प्रथम त्यांची नेमणूक रॉयल हॉर्स गार्डमध्ये झाली. १८२८मध्ये लेफ्टनंट आणि १८३२साली कॅप्टन अशा नोकरीत पायºया ते चढू लागले. त्यानंतर १८३७ साली मद्रास प्रांताच्या गव्हर्नरपदी त्यांची नेमणूक झाली, या काळामध्ये त्यांनी निलगिरीमध्ये एक घरही बांधले होते. १८४५ ते १८५३ या काळामध्ये इंग्लंडमध्ये नोकरी केल्यानंतर त्यांची मुंबईच्या गव्हर्नरपदी नेमणूक झाली.
एलफिन्स्टन सर्कलसाठी पाठिंबा
दक्षिण मुंबईतील एका दुलर्क्षित जागेवर बाग बांधून त्याच्या सभोवती इमारती बांधाव्यात अशी कल्पना तत्कालीन पोलीस कमिशनर चार्ल्स फोर्जेट यांनी मांडली .त्याला जॉन एलफिन्स्टन यांनी नंतर बार्टल फ्रिअर यांनी पाठिंबा दिला आणि मदतही केली. त्यानंतर या जागेवर बागेच्या विकासाला सुरुवात झाली आणि १८७२ साली ही बाग बांधून झाली. जॉन एलफिन्स्टन यांनी केलेल्या मदतीच्या आणि स्मृतीप्रित्यर्थ तिचे नाव एलफिन्स्टन सर्कल असे ठेवण्यात आले, स्वातंत्र्यानंतर बेंजामिन हॉर्निमन यांच्या नावाने बागेचे हॉर्निमन सर्कल असे करण्यात आले. आजही हॉर्निमन सर्कलजवळ मोठ्या बँकांची व कंपन्यांची कार्यालये आहेत.

 

Web Title: Named after Elphinston station's "Prabhadevi"

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.