जातीच्या नावांच्या जागी महापुरुषांची नावे; सरकारी पातळीवर हालचालींना वेग
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2022 06:06 AM2022-04-27T06:06:31+5:302022-04-27T06:06:54+5:30
म्हसळ्यातील वाड्या-वस्त्यांचे लवकरच ‘बारसे'
म्हसळा : पारंपरिक पद्धतीने गाव, शहर वाडी-वस्तीत ज्या जातीची लोकवस्ती वाडीवस्तीला त्या त्या जातींच्या नावाने किंबहुना तोच नामोल्लेखातून वाडीवस्तीची ओळख होत असे. आजतागायत विविध शहरांतील विशेषत: ग्रामीण भागातील गावांची व रस्त्यांची नावे जातीवाचकच आहेत. अशाच म्हसळा नगरपंचायतीच्या ६ प्रभागांतील १० वाडीवस्त्यांच्या नामकरणाचा प्रस्ताव सरकारी पातळीवर आखण्यात आला असून, महापुरुषांच्या नावे या वाड्यांना देण्यात येणार असल्याची माहिती आहे.
म्हसळा शहरातील प्रामुख्याने समाजनिहाय लोकवस्ती असलेल्या ब्राह्मणआळी, तांबटआळी, सोनारआळी, म्हसळा बौद्धवाडी, गवळवाडी, सावर गवळवाडी, सावर बौद्धवाडी, कुंभारआळी, बेलदारवाडी अशी जातीवाचक वाडी-वस्तीची प्रामुख्याने ओळख आहे. आता या जातीवाचक नावात बदल घडवून आणण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू आहेत. आता जातीवाचक नावांऐवजी लोकशाही मूल्यांशी निगडित महापुरुषांची नावे देण्यासाठी शासन निर्णय क्रमांक संकिर्ण २०२९/प्र.क्र. ३३३ / अजाक, दिनांक ६/५/२१ नुसार म्हसळा शहरातील वाडीवस्तींची नावे बदलण्यात येणार आहेत.
जिल्हा अधिकारी रायगड-अलिबाग यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून, म्हसळा नगर पंचायतीने शहरातील प्रामुख्याने १० वाडी वस्तींची नावे जातीवाचक असल्याचे साहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाला पत्र पाठवून कळविले आहे.