औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय सरकारच्या अजेंड्यावर नाही: राजेश टोपे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2022 12:32 PM2022-05-17T12:32:48+5:302022-05-17T12:35:47+5:30
औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान राजेश टोपे यांनी केलं आहे.
औरंगाबादच्या नामांतरावरुन शिवसेना आणि भाजपामध्ये जुंपलेली असताना राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचा विषय महाविकास आघाडी सरकारच्या अजेंड्यावर नाही, असं विधान केलं आहे. राष्ट्रवादीच्या भूमिकेमुळे शिवसेनेच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
"शिवसेनेला औरंगाबादला संभाजीनगर म्हणू द्यात. पण औरंगाबादचं नाव संभाजीनगर करण्याचं महाविकास आघाडीच्या अजेंड्यावर नाही. हे त्या त्या पक्षाचे अजेंडे असतात. माझं व्यक्तिगत मत देणं योग्य नाही. हा सरकारच्या अजेंड्याचा विषय नाही. आमच्या पक्षाच्या तर अजिबातच नाही. मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे लोक संभाजीनगर म्हणतात. त्यात त्यांना नक्कीच आनंद वाटतो", असं राजेश टोपे म्हणाले.
गरजेप्रमाणे आणि सोयीप्रमाणे लोक संभाजीनगर बोलतात पण मला वाटत नाही की आज हा लगेच अजेंड्यावरचा विषय आहे. आपल्यासमोर इतर अनेक महत्वाचे प्रश्न आहेत. पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचे, वीजेचे आणि इतरही प्रश्न आहेत. ते सोडवण्याकडे लक्ष द्यायला हवं, असंही राजेश टोपे म्हणाले.
मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत म्हटलं होतं संभाजीनगर!
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी १४ मे रोजी बीकेसी येथील जाहीर सभेत औरंगाबादला संभाजीनगर म्हणतोय आणि ते आहेच. संभाजीनगर असं नामांतराची गरजच काय? असं विधान केलं होतं. त्यावर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करत औरंगाबादचं नामांतर आता भाजपाची सत्ता आल्याशिवाय होत नाही असं म्हटलं. यारुन त्यांनी शिवसेनेवर हल्ला चढवला होता. 'ओ खैरे व्हा आता बहिरे, औरंगाबादचा कायमचा झाला कचरा आणि भाजपचं सरकार येत नाही तोपर्यंत संभाजीनगर विसरा, असा टोला फडणवीसांनी लगावला होता.