नाना पाटेकर-अमित शाह भेटीची चर्चा तर होणारच !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 04:24 PM2019-08-20T16:24:33+5:302019-08-20T16:28:38+5:30
सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर लगेचच नानांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार, अशा शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. तर राजकीय विश्लेषकांच्या मते नाना पाटेकर भाजपमध्ये न जाता भाजपमित्र म्हणून काम करू शकतात.
मुंबई - नुकतेच मीटू प्रकरणातून सहिसलामत बाहेर पडलेले ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेतली. नाना पाटेकर आणि शाह यांच्या भेटींने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. तसेच नाना पाटेकर भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चाही सुरू झाल्या. याआधी नाना पाटेकर यांनी राजकीय घडामोडींवर आपली मतं मांडलेली आहेत. या व्यतिरिक्त त्यांनी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्नही केले होते.
नाना पाटेकर यांनी काही दिवसांपूर्वीच सांगली, कोल्हापूर येथील दुष्काळग्रस्तांची भेट घेऊन मदतीचा हात पुढे केला होता. या दोन जिल्ह्यातील पुरग्रस्तांच्या व्यथा अमित शाह यांचासमोर नानांनी मांडल्या की, भाजपमध्ये जाण्यासाठी नाना प्रयत्नशील आहेत किंवा शाह यांच्या भेटीचं याव्यतिरिक्त दुसरं काही कारण आहे का हे अद्याप समजू शकले नाही.
सांगली, कोल्हापूर येथील पुरग्रस्तांची भेट घेतल्यानंतर लगेचच नानांनी अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे ते राजकारणात सक्रिय होणार, अशा शक्यता व्यक्त करण्यात येत आहेत. तर राजकीय विश्लेषकांच्या मते नाना पाटेकर भाजपमध्ये न जाता भाजपमित्र म्हणून काम करू शकतात.
दुसरीकडे लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपने सेलिब्रेटींना भेटून प्रचार मोहीम सुरू केली होती. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाना आणि अमित शाह यांची भेट झाल्याची शक्यताही व्यक्त करण्यात येत आहे. नाना यांनी अभिनेता मकरंद अनासपुरे यांच्या सोबतीने राज्यात 'नाम फाउंडेशन'च्या माध्यमातून अनेक कामे केली आहेत. तसेच आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला. त्यामुळे नाना यांचा महाराष्ट्रात एक खास चाहता वर्ग आहे. नाना भाजपमध्ये गेल्यास भाजपला त्याचा विधानसभा निवडणुकीत फायदा होऊ शकतो.