LMOTY 2022: नाना पाटेकर म्हणाले, ९ महिन्यांत १०९२ आत्महत्या...; शिंदे, फडणवीसांनी त्यावर सांगितली जबरदस्त योजना
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 07:24 AM2022-10-14T07:24:16+5:302022-10-14T07:24:44+5:30
Lokmat Maharashtrian of the year awards 2022: शेतकऱ्यांच्या आत्महत्या, न परवडणारी शेती या विषयावर महामुलाखतीत नाना काय म्हणाले...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेतकऱ्यांच्या आत्महत्या, न परवडणारी शेती या विषयावर महामुलाखतीत नाना काय म्हणाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितली जबरदस्त योजना.
नाना : नऊ महिन्यांमध्ये एक हजार ९२ आत्महत्या झालेल्या आहेत, आपण सहजपणे या बातम्या वाचतो आणि पुढचं पान उलटतो. काही विचारले की प्रत्येकाने एकमेकांकडे बोटं दाखवायची. एकनाथराव... पारंपरिक शेती करत असताना आम्हाला ती परवडत नाहीये. हमीभाव नाहीये. कुठलं पीक लावायचं हे सांगणारी माणसं पाहिजेत. आम्ही अडाणी लोक आहोत. आम्हाला कळत नाही. आणि शेती परवडत नाही म्हणून आम्ही जमीन विकत चाललो आहोत. नंतर वेठबिगार होतोय, याचा काही विचार आहे की नाही?
शिंदे : नाना... आपलं सरकार आल्यावर आपण शेतकऱ्यांच्या आत्महत्या व्हायलाच नको, यासाठी मोठ्या प्रमाणावर योजना आखल्या. जवळपास ११ हजार कोटी रुपयांच्या योजनांना मंजुरी दिली आहे. दोन लाख हेक्टर जमीन ओलिताखाली येईल. समुद्राकडे वाहून जाणारं पाणी दुष्काळग्रस्त भागात वळवण्याचा मोठा प्रकल्प आम्ही हाती घेतला आहे. जेणेकरून शेतकरी आत्महत्या करणार नाहीत. शेतीला जोडधंदा कसा द्यायचा याचीही चर्चा झाली आहे. आमचे अधिकारी काम करत आहेत. विशेष कृती आराखडा बनवण्याचा प्रयत्न करत आहोत. कोकण आहे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण कमी आहे. मराठवाडा, विदर्भामध्ये जे शेतकरी आत्महत्या करतात, त्याचं प्रमाणे कमी आलं पाहिजे. जे आमच्यासाठी महत्त्वाचं आहे. देवेंद्रजी गेली पाच वर्षे मुख्यमंत्री होते. त्यांंनी जलयुक्त शिवार योजना मोठी सुरू केली. नंतर ती अडीच वर्षांमध्ये बंद झाली. पुन्हा आम्ही ती सुरू केली आहे. शेवटी जमीन पाण्याखाली आणणं महत्त्वाचे आहे.
फडणवीस : नाना. याला एकच जोड देतो, जिथे सिंचन आहे तिथे आत्महत्या नाही. जिथे सिंचन नाही तिथेच आत्महत्या आहे. सगळा दुष्काळी पट्टा दूर करण्यासाठी सर्व भाग जलयुक्त शिवारअंतर्गत आला पाहिजे. जलयुक्त शिवारमुळे ३९ लाख हेक्टर जमीन रब्बीच्या पिकाखाली आली, त्यामुळे त्याला दोन पिकं घेता येतात. आमचा संकल्प आहे की वाहून जाणारं पाणी गोदावरीमध्ये जर आणलं. विदर्भातील वाहून जाणारं पाणी बुलडाण्यापर्यंत आणू शकलो तर तो सगळा दुष्काळी पट्टा ओलिताखाली येईल. आपण शेतकऱ्यांना सकाळी अर्धी वीज रात्री अर्धी वीज देतो. त्याला साप विंचवाचा सामना करत रात्रभर काम करावे लागते. म्हणून १०० टक्के ॲग्रीकल्चर फिडर सोलरवर आणतोय. दोन ते तीन वर्षे लागतील, चार हजार मेगावॅटचे सोलर फिडर केले जातील. शेतकऱ्याला रोज दिवसा १२ तास वीज मिळेल. याचे मॉडेल आपण तयार केले आहे. हे सोलार करण्याकरिता आम्हाला जमिनी मिळत नाहीत. म्हणून जो शेतकरी त्याची जमीन भाडे तत्त्वावर देईल, त्याला त्याचे साधारणपणे ६० हजार ते ७५ हजार रुपये भाडे मिळेल. त्याच्या शेतात जेवढे पिकेल, त्यापेक्षा जास्त उत्पादन त्याला मिळेल, अशी व्यवस्था केली आहे. हे भाडे त्याला ३० वर्षे देऊ. त्या जमिनीवर सोलार लावून संपूर्ण फिडरवरचे जेवढे शेतकरी आहेत, त्यांना आम्ही १२ तास दिवसा वीज देऊ. एकीकडे विहिरी आपण केलेल्या आहेत. मात्र, वीज नसल्याने पीक सुकतंय. वीज जर दिवसा मिळाली तर आत्महत्येचं प्रमाण निश्चितपणे कमी होईल.