"उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती"; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,"मला चिल्लर गोष्टी..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2024 05:22 PM2024-11-28T17:22:45+5:302024-11-28T17:33:55+5:30

अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्रीपदावरुन केलेल्या टीकेला नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Nana Patole has responded to Ambadas Danve criticism of the Chief Minister post | "उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती"; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,"मला चिल्लर गोष्टी..."

"उद्धव ठाकरेंच्या नावावर जास्त मतं मिळाली असती"; दानवेंच्या दाव्यावर पटोले म्हणाले,"मला चिल्लर गोष्टी..."

Nana Patole on Ambadas Danve : विधानसभा निवडणुकीमध्ये सपाटून मार खावा लागल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये सध्या धुसफूस सुरु आहे. ठाकरे गटाकडून स्वबळाचे संकेत देण्यात आले होते. मात्र त्यानंतर आज अंबादास दानवेंनी मात्र आम्ही महाविकास आघाडीमध्येच राहणार आहोत असे स्पष्ट केले आहे. मात्र अंबादास दानवेंनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधत लोकसभेच्या विजयानंतर विधानसभेमध्ये काँग्रेसला आत्मविश्वास नडला असल्याचे म्हटलं आहे. यासोबतच महाविकास आघाडीमधल्या मुख्यमंत्रीपदावरून झालेल्या वादावरून दानवेंनी पुन्हा एकदा काँग्रेसला टोला लगावला आहे.

"लोकसभा जिंकल्यानंतर काँग्रेसच्या मनामध्ये जास्त अतिआत्मविश्वास आला असावा. जम्मू-काश्मीर, हरियाणा आणि महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी काँग्रेस जिंकू शकत होती अशी स्थिती निश्चित होती. काही कार्यकर्ते म्हणत होते की, काँग्रेसची लोकं आता मुख्यमंत्री कोण  होणार तसेच कोणतं खाते मिळणार यावर चर्चा करत होते हे सत्य आहे. मुख्यमंत्रीपदासाठी काँग्रेसचे दहा जण इच्छुक होते. मला असं वाटतं की उद्धव ठाकरे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी पुढे गेलं असतं तर दोन पाच टक्के मतं जास्त मिळाली असती, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.

अंबादास दानवे यांच्या विधानाला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मला चिल्लर गोष्टींमध्ये पडायचं नाही, असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे. कोणाच्या बोलण्यामुळे आपल्याला काही फरक पडत नसतो, असं देखील नाना पटोलेंनी म्हटलं आहे.

"मला चिल्लर गोष्टीत पडायचं नाही. कोण हरलं कोण जिंकलं त्यावर नाही जायचं आहे. कोण काय बोलतो त्याच्यावर नाही जायचं आहे. मी लोकशाही वाचवण्याबद्दल बोलत आहे. कोणाचा काय स्वार्थ आहे या विषयावर मला बोलायचं नाहीये," असं प्रत्युत्तर नाना पटोलेंनी दिलं.

शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही अंबादास दानवेंच्या विधानावर भाष्य केलं. "निवडणुका संपल्या आहेत. तिकीट वाटप झालेलं आहे. त्यावर चर्चा करण्यात काय अर्थ आहे," असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.

Web Title: Nana Patole has responded to Ambadas Danve criticism of the Chief Minister post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.