30-40 जागांचा वाद! शरद पवार, उद्धव ठाकरेंशी चर्चा करुन मार्ग काढू; नाना पटोलेंची स्पष्टोक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2024 04:22 PM2024-10-21T16:22:26+5:302024-10-21T16:23:22+5:30
Nana Patole on Mahavikas Aghadi : काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवरुन चांगलीच जुंपली आहे.
Nana Patole on Mahavikas Aghadi : एकीकडे भारतीय जनता पक्षाने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, तर दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये अद्याप जागावाटपावर एकमत झाले नाही. काँग्रेस आणि शिवसेनेत काही जागांवरुन चांगलीच जुंपली आहे. यामुळे उद्धव ठाकरेमहाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतील, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली.
#WATCH | Maharashtra Congress chief Nana Patole says, "We have discussed 96 seats today. There are some seats in the discussion, but we did not talk about them. We will talk to Sharad Pawar, and Uddhav Thackeray tomorrow. Regarding the sharing problem on 30-40 seats, we will find… pic.twitter.com/2ksDGrmUwe
— ANI (@ANI) October 21, 2024
दिल्लीत मीडियाशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, 'आमची 96 जागांबाबत चर्चा झाली आहे. 30-40 जागांबाबत वाद आहेत, त्यावर अद्याप चर्चा झालेली नाही. ज्या पक्षाचा जिथे अधिकार आहे, त्या जागा तो पक्ष लढेल. उद्या मी मुंबईत शरद पवार आणि उद्धव ठाकरेंशी या जागांबाबत चर्चा करुन मार्ग काढणार आहोत. भाजप घाबरल्यामुळे अशाप्रकाचा अफवा पसरवत आहे,' अशी प्रतिक्रिया नाना पटोलेंनी दिली.
विदर्भाताली जागांवरुन काँग्रेस-शिवसेनेत वाद
मिळालेल्या माहितीनुसार, विदर्भातील जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरे गटात वाद पेटला आहे. शिवसेनेने विदर्भात तीन जागा मागितल्या आहेत. पण, काँग्रेस विदर्भातील एकही जागा ठाकरे गटाला देऊ इच्छित नाही. नाना पटोलेंच शिवसेनेला जागा सोडण्यास विरोध आहे. ठाकरे गटाने लोकसभेला काँग्रेससाठी विदर्भातील दोन जागा सोडल्या होत्या. रामटेकची सहा वेळा खासदार निवडून येत असलेली जागा आणि अमरावतीची ठाकरे गटाने काँग्रेससाठी सोडली. आता आम्हाला विधानसभेला तीन जागा सोडा, असा युक्तीवाद शिवसेनेने केला आहे. तर लोकसभेला शिवसेनेला जास्त जागा दिल्या, यामुळे आता त्यांनी आम्हाला जास्त जागा द्याव्यात, असा युक्तीवाद काँग्रेसकडून केला जात आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
शिवसेना स्वबळावर लढण्याच्या विचारात असल्याचे मीडियात येत आहे. त्यावर आता विजय वडेट्टीवार बोलले आहेत. ते म्हणाले की, 'ही चर्चा अजिबात झालेली नाही. हे कुठेतरी भांडणे लावण्याचा पद्धतशीर प्रयत्न भारतीय जनता पक्षाकडून होत आहे. कारण राज्यात भारतीय जनता पक्ष घाबरलेला पक्ष आहे.' संजय राऊत अमित शाहांमध्ये बोलणे झाल्याचेही वृत्त समोर आले. त्यावर वडेट्टीवार म्हणाले की, 'मूळात अशी कुठलीही चर्चा झाली नाही. संजय राऊतांना जेलात कुणी घातले? त्यामुळे या बातम्यांत अजिबात तथ्य नाही. आमच्या हायकमांडकडे कुठेही चर्चा झालेली नाही. उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीबरोबर आहेत आणि आम्ही महाविकास आघाडी म्हणून लढणार आहोत', असे वडेट्टीवारांनीही स्पष्ट केले.