“भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ED, CBIकडून कारवाई”; पटोलेंची फडणवीसांवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2024 03:18 PM2024-07-25T15:18:03+5:302024-07-25T15:19:34+5:30

Congress Nana Patole News: देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता, अशी टीका नाना पटोलेंनी केली.

nana patole replied devendra fadnavis over criticism on anil deshmukh | “भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ED, CBIकडून कारवाई”; पटोलेंची फडणवीसांवर टीका

“भाजपाची ऑफर धुडकावणाऱ्यांवर ED, CBIकडून कारवाई”; पटोलेंची फडणवीसांवर टीका

Congress Nana Patole News: भारतीय जनता पक्षाचे सरकार ईडी, सीबीआय, आयकर विभाग या केंद्रीय यंत्रणांचा वारेमाप गैरवापर करून विरोधकांना संपवण्याचे काम करते हे उघड आहे. ज्यांनी भाजपाची ऑफर स्विकारली ते पवित्र झाले व ज्यांनी नाकारली त्यांच्यावर यंत्रणाच्या माध्यमातून कारवाई करुन जेलमध्ये टाकण्यात आले. आपल्याकडे विरोधकांच्या ऑडिओ, व्हिडिओ क्लिप आहेत त्या उघड करेन असे देवेंद्र फडणवीस धमकावत आहेत. फडणवीस गृहमंत्री आहेत त्यांच्याकडे क्लिप असतील तर कारवाई करावी, धमक्या कसल्या देता, अशी विचारणा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. 

पत्रकारांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आमदारांना निधी देण्यासाठी पैसे काय सरकारी जमिनी विकून आणू काय? असे अर्थमंत्री अजित पवार मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणाल्याची चर्चा आहे. महायुती सरकारने राज्य गहाण ठेवले आहे, हे आम्ही म्हणत होतो त्याला अर्थमंत्री अजित पवार यांनी दुजोराच दिला आहे. या सरकारने राज्यावर ९ लाख कोटी रुपयांचे कर्ज करून ठेवले आहे. विकासाच्या नावाखाली कर्ज काढले पण विकास फक्त सत्ताधारी लोकांचा झाला. समृद्धी महार्गावर अपघात होत आहेत. २० वर्ष या महामार्गाला काहीच होणार नाही असा दावा करत होते, त्यावर आता खड्डे पडले, भेगा गेल्या आहेत. ५५ हजार कोटी रुपयांच्या या महामार्गातून सत्ताधारी पक्षातील लोकांचीच समृद्धी झाली आहे, या शब्दांत नाना पटोले यांनी निशाणा साधला.

एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी ईडीच्या धाकाने भाजपाच्या गळाला लागले

नाईलाजाने मला पक्षबदल करावा लागला असे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते रविंद्र वायकर यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सांगितले. एकनाथ शिंदे व त्यांचे सहकारी ईडीच्या धाकाने भाजपाच्या गळाला लागले आहेत, तोच प्रयोग माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरही केला असेल, त्या गोष्टींचा ते खुलासा करत आहेत. गृहमंत्री फडणवीस यांच्याकडे काही ऑडिओ व्हिडिओ क्लिप असतील तर त्यांनी कारवाई केली पाहिजे, त्यांना अडवले कोणी. निवडणुकीच्या तोंडावर वादग्रस्त विधाने करून काय उपयोग. राज्याची कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे, राज्यात ड्रग्ज आणून तरूणपिढी बरबाद केली जात आहे, ड्रग्ज माफियांना ससूनमध्ये व जेलमध्ये फाईव्ह स्टार सुविधा दिल्या जात आहेत, त्यावर काही बोलत नाहीत. गृहमंत्रीपदाचा उपयोग काय फक्त विरोधकांना धमकवण्यासाठी करत आहात काय, असा थेट सवाल नाना पटोलेंनी केला. 

राज्यातील आपत्ती व्यवस्थापन ढेपाळले

राज्यातील काही भागात मुसळधार पाऊस पडत आहे. नागपूर, भंडारा, गोदिया, कोल्हापूर, पुणे येथे पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुण्यात मुसळधार पाऊस पडत असतानाच खडकवासला धरणातील पाण्याचा विसर्ग अचानक वाढवण्यात आला, त्याची कल्पना नागरिकांना दिली नाही, लोकांच्या घरात पाणी गेले, सोसायट्यांमध्ये पाणी गेले. पाण्यात अडकलेल्या लोकांना मदत पोहचण्यास उशिर झाला, एकच बोट मदतीसाठी आली होती. सरकारचे आपत्ती व्यवस्थापन ढेपाळले आहे. एवढी गंभीर परिस्थीती होत असताना सरकार मात्र कुंभकर्णी झोपेत होते. पुण्यातील लोकांना तातडीने मदत मिळाली पाहिजे तसेच राज्यात कोठेही संकट ओढवले तर तात्काळ यंत्रणा पोहचल्या पाहिजेत, याकडे सरकारने लक्ष द्यावे असेही नाना पटोले म्हणाले.
 

Web Title: nana patole replied devendra fadnavis over criticism on anil deshmukh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.