काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 18:45 IST2024-11-07T18:44:38+5:302024-11-07T18:45:49+5:30
Nana Patole slams Ashok Chavan, Maharashtra Assembly Election 2024: काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची अशोक चव्हाणांवर जळजळीत शब्दांत टीका

काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
Nana Patole slams Ashok Chavan, Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करत आहेत. याच दरम्यान, नांदेडमध्ये आज काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आधी काँग्रेसमध्ये असलेले आणि आता भाजपाचे खासदार असलेले अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली. "अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्षातून दोनदा मुख्यमंत्रीपद, अनेक वर्षे मंत्रीपद भोगले पण काँग्रेस पक्ष अडचणीत असताना ते काँग्रेसला सोडून भाजपात गेले. ज्या काँग्रेस पक्षाने त्यांना मोठे केले त्यालाच आज ते शिव्या देत आहेत. अशोक चव्हाण भाजपामध्ये असते तर त्यांचा राजकीय उदय झाला नसता. दोनदा मुख्यमंत्री झाले पण त्यांनी स्वतःचे घर भरण्याचेच काम केले. सत्तेचा वापर करून दहा पिढ्यांचा उद्धार केला आणि जेलमध्ये जावे लागेल या भितीने अशोक चव्हाण भाजपात गेले," असा घणाघात नाना पटोले यांनी केला.
काँग्रेसचा हात
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 7, 2024
महाराष्ट्र घडवणार! #यंदा_पंजा#Congress#MaharashtraElection2024pic.twitter.com/4iWH1BrXHE
नांदेड लोकसभेच्या पोटनिवडणूकीतील काँग्रेस मविआचे अधिकृत उमेदवार रविंद्र वसंतराव चव्हाण आणि भोकर विधानसभेचे अधिकृत उमेदवार तिरुपती (पप्पू) कदम कोंढेकर यांच्या प्रचारार्थ नाना पटोले यांची मुदखेड मध्ये जाहीर सभा झाली. "मराठवाड्यात गायरान जमिनीचा प्रश्न गंभीर असून अशोक चव्हाण दोनदा राज्याचे मुख्यमंत्री झाले, तरीही त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर गायरान जमिनीचा प्रश्न सोडवू. या भागात शेतात जाण्यासाठी आजही पाणंद रस्ते आहेत, सरकार आल्यानंतर हे पाणंद रस्तेही मजबूत केले जातील. नांदेड जिल्ह्यात भाजपा विरुद्ध काँग्रेस असे चित्र कुठेच दिसत नसून येथील हुकूमशाहीच्या विरोधात काँग्रेस लढत आहे, या हुकूमशाहीला सत्तेतून बाहेर काढले पाहिजे."
"राज्यात आज महिला सुरक्षित नाहीत, शाळेत जाणाऱ्या मुली सुरक्षित नाहीत, ६७ हजार महिला राज्यातून बेपत्ता झाल्या आहेत, पण सरकारकडे त्याचे उत्तर नाही. मविआ सत्तेत आल्यानंतर महिलांचा मान मन्मान राखला जाईल, महिलांना दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातील, राज्यभर एसटी बस प्रवास मोफत असेल. शिंदे भाजपा सरकारने प्रचंड भ्रष्टाचार केला असून सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यामध्ये लाखो रुपये वसूल केले आहेत, युती सरकारचे यासाठी रेडकार्ड ठरलेले आहे. मविआ सरकार आल्यास भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र करण्याचा संकल्प आहे," असे आश्वासन नाना पटोले यांनी दिले.