१६ तारखेला फायनल! '..तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत', 'मविआ'तील वादावर नाना पटोले स्पष्टच बोलले!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 12, 2022 02:26 PM2022-08-12T14:26:00+5:302022-08-12T14:26:55+5:30
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे.
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरच महाविकास आघाडीतील मतभेद समोर आले आहेत. विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदी शिवसनेचे अंबादास दानवे यांची नियुक्ती झाली आहे. मात्र, ही नियुक्ती करताना शिवसेनेने महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या मित्रपक्षांना विश्वासात घेतले नव्हते अशी खदखद काँग्रेस नेत्यांकडून बोलून दाखवली जात आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत बोलताना दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत, असं सूचक विधान केलं आहे.
महाविकास आघाडीच्या समन्वयाच्या बैठकीबाबत विचारलं असताना नाना पटोले यांनी ते स्वत: आणि बाळासाहेब थोरात पदयात्रेत व्यग्र आहेत. त्यामुळे कालच्या बैठकीला अशोक चव्हाण उपस्थित होते अशी माहिती दिली. तसंच आता १६ ऑगस्ट रोजी पुन्हा एकदा बैठक होणं अपेक्षित आहे अशीही माहिती नाना पटोले यांनी दिली.
"दोस्तीत सगळ्या गोष्टी एकमेकांना विचारुन केल्या पाहिजेत. आपल्याच मताने सगळ्या गोष्टी करायच्या तर त्याला दोस्ती म्हणत नाहीत. ही महाविकास आघाडी विपरीत परिस्थितीत निर्माण झाली होती. महाराष्ट्राच्या हितासाठी सोनिया गांधी यांनी तसा निर्णय घेतला होता", असं महत्वाचं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.
"मला ज्यावेळी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचं ठरलं होतं तेव्हा मी सगळ्यांना सांगायला गेलो होतो. पण ठिक आहे त्यांना फॉरमॅलिटी देखील पाळायची नसेल तर ठीक आहे कुणावरही जबरदस्त नाही. काँग्रेस हा जनतेतील पक्ष आहे आणि निश्चितपणे जनता काँग्रेससोबत आहे. आमच्या मित्रांनी प्रमाणिकपणे रहावे आणि विचारविनिमय करावा हीच विनंती. खालच्या सभागृहात अजित पवार आहेत आणि वरच्या सभागृहात नीलम गोऱ्हे आहेत. त्यामुळे काँग्रेसला विरोधी पक्षनेते पद मिळावे अशी आमची इच्छा होती. आमच्या जागा कमी असल्याचा विषयच नाही. सगळ्यांच्या बरोबर जागा आहेत. उद्धव ठाकरेंनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिलेला नाही. नाहीतर त्यांचेही दहाच असते", असंही नाना पटोले म्हणाले.
भाजपा एक वॉशिंग मशिन
"भाजपा विरोधात बोललं की कारवाई होते. पाठीशी राहिलो की स्वच्छ होतो. भाजपा एक वॉशिंग मशिन आहे, असं आता सामान्य माणूस देखील बोलत आहे. भाजपाला त्याची लाज राहिलेली नाही. इंग्रज जसं करत होते तसंच भाजपावाले करत आहेत", असं नाना पटोले म्हणाले. तसंच महाराष्ट्राच्या राजकारणाबाबतची १२ तारीख आता २२ करण्यात आली आहे. डीले जस्टीस ही वाईट प्रक्रिया आहे. राज्यातील ईडी सरकार असंवैधानिक आहे. तारीख पे तारीख हे देशाच्या संविधानाला आधारित नाही ही आमची भूमिका आहे, असंही नाना पटोले पुढे म्हणाले.
भाजपाकडून तिरंग्याचा अपमान
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्तानं केंद्र सरकारनं जाहीर केलेल्या हर घर तिरंगाच्या मोहिमेवरही नाना पटोले यांनी टीका केली. "जे तिरंगे घरी दिले जात आहेत त्यात अशोकचक्र मध्यभागी नाही. कारण ते चीनवरुन आयात केले जात आहेत. केंद्रात सत्तेत आल्यानंतर सगळं चीनवरुनच आयात होत आहे. चीनवरुन जे झेंडे आणले गेले आहेत त्यातून देशाचा अपमान झाला आहे. इतकंच काय तर परभणीत काल भाजपावाल्यानं चक्क तिरंग्यावर कमळ टाकलं होतं. आमच्या सन्मानाला ठेच पोहोचवण्याचं काम भाजपा करत आहे. तिरंग्याचा अपमान करण्याचा अधिकार भाजपाला नाही", असं नाना पटोले म्हणाले.