Nana Patole: नाना, तू उद्या फडणवीसांच्या बंगल्यावर येच; प्रसाद लाड यांचा नाना पटोलेंना धमकीवजा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2022 08:09 PM2022-02-13T20:09:10+5:302022-02-13T20:09:39+5:30
Nana Patole on Devendra Fadanvis Bungalow Agitation: दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवास्थानसमोर आंदोलन केले होते. तेव्हा त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने राडा झाला होता. आता फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उद्या पुन्हा मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना पसरविण्यास महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याचे संसदेत वक्तव्य केल्याविरोधात आता काँग्रेस कार्यकर्ते उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर धडकणार आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हा इशारा देताच भाजपाचे आमदार प्रसाद लाड यांनी नाना तू ये, बघतोच परत कसा जातो ते, असा धमकीवजा इशारा दिल्याने राजकारण तापण्याची शक्यता आहे.
दोन दिवसांपूर्वी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या निवास्थानसमोर आंदोलन केले होते. तेव्हा त्यांना भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विरोध केल्याने राडा झाला होता. आता फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उद्या पुन्हा मोठा राडा होण्याची शक्यता आहे.
आरएसएसमध्ये जे मोठे झाले ते पदावर बसले, ही आरएसएसची संस्कृती आहे का असा सवाल पटोले यांनी केला आहे. राहुल गांधीबाबत बोलणाऱ्या आसामचे मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी. देशाचे पंतप्रधान संसदेत कसे भाषण करतात? त्यांना जनता कधीही माफ करणार नाही. मोदींनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला, तेव्हा भाजापचे सदस्य बाके वाजवत होते. याचा निषेध म्हणून आम्ही फडणवीस यांच्या बंगल्यासमोर उद्या आंदोलन करणार असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली.
यावर भाजपाच्या नेत्यांची प्रतिक्रिया आली आहे. नाना, तुझ्या आव्हानाला प्रति आव्हान देतो. उद्या तू सागरवर ये, नाही तुला उलटा प्रसाद दिला तर आम्हीपण भाजपवासी नाही. पाहतो तू कसा परत जातो ते, अशा शब्दांत प्रसाद लाड यांनी नाना पटोलेंना आव्हान दिले आहे. यावर काँग्रेसचे सरचिटणीस व मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी प्रसाद लाड यांना प्रसाद लाड हे फडणवीसांच्या बंगल्यावरचा वॉचमन असल्याचे म्हणत आम्ही उद्या येणार, तुमच्याने जी गुंडगिरी करायची आहे ती करा, नाहीतरी भाजपा आता गुंडांचाच पक्ष झाल्याचा टोला लगावला आहे.