नाना उद्धट; पण ‘तसे’ काही करणार नाही - राज ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 05:39 AM2018-10-19T05:39:15+5:302018-10-19T05:39:30+5:30
सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाना पाटेकर आणि तनुश्री वादावर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच भाष्य केले.
अमरावती : नाना पाटेकर कधी कधी मूर्खपणा करतो, उद्धट आहे, विचित्र वागतो. पण तो ‘तसे’ प्रकार काही करणार नाही, अशी आपली खात्री आहे, अशा शब्दांत गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नानाची पाठराखण केली. ‘मी टू’ चळवळीमागे सत्ताधारी असल्याचा संशयही त्यांनी व्यक्त केला आहे.
सध्या विदर्भ दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांनी नाना पाटेकर आणि तनुश्री वादावर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच भाष्य केले. पेट्रोल आणि डिझेलचे वाढते दर, गगनाला भिडलेली महागाई, रुपयाचे रोजच्या रोज होत असलेले अवमूल्यन या साºयांपासून लोकांचे लक्ष वळविण्यासाठी सरकारमधील काही मंडळींनीच तर ‘मी टू’ मोहीम सुरू केली नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. सध्या सत्तेवर बसलेले लोक काहीही करू शकतात, असा आरोप राज यांनी केला. ‘मी टू’ प्रकरणामुळे महिलांवरील लैंगिक शोषण, छळ आणि अत्याचाराचा विषय हास्यास्पद बनला आहे, अशी टीका करून राज ठाकरे म्हणाले की, तब्बल दहा वर्षांपूर्वीच्या घटनेवर आज सोशल मीडियातून ‘मी टू’ करण्यात अर्थ नाही. तेव्हाच संबंधित महिलांनी विरोध केला असता तर त्याला अर्थ प्राप्त झाला असता, असे सांगून जातीपातींप्रमाणे आता स्त्री-पुरुष असा नवा प्रकार सुरू झाला की काय, असा प्रश्न पडल्याचेही ते म्हणाले.
नानासोबत घडलेल्या प्रकारानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोपही तनुश्रीने केला होता. नंतर तनुश्रीने पोलिसात दिलेल्या तक्रारीत मीडियाच्या लोकांनी हल्ला केल्याचे म्हटले. दहा वर्षांनी आमच्या कार्यकर्त्यांवर आरोप होत आहेत. पण त्या हल्ल्याशी मनसेचा संबंध नाही. - राज ठाकरे