मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान; नानाजी देशमुख यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2019 10:06 PM2019-01-25T22:06:37+5:302019-01-25T22:07:13+5:30

‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते. नानाजींची कर्मभूमी राजस्थान आणि उत्तर प्रदेश असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे.

Nanaji Deshmukh given Bharat Ratna | मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान; नानाजी देशमुख यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव

मराठवाड्याच्या भूमिपुत्राला ‘भारतरत्न’ सन्मान; नानाजी देशमुख यांच्या कार्याचा सर्वोच्च गौरव

Next

- नंदकिशोर पाटील

‘भारतरत्न’ हा सर्वोच्च सन्मान मिळालेले चंडिकादास अमृतराव देशमुख उपाख्य नानाजी देशमुख यांचे महाराष्ट्राच्या मातीशी खूप जुने ऋणानुबंध होते. नानाजींची कर्मभूमी राजस्थान आणि उत्तर प्रदेश असली तरी त्यांची जन्मभूमी महाराष्ट्र आहे. मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील कडोली या छोट्याशा गावी त्यांचा ११ ऑक्टोबर १९१६ रोजी झाला. घरची आर्थिक परिस्थिती बेताची. त्यात लहानपणीच त्यांच्या डोक्यावरचे मातृपितृ छत्र हरपले. मामांनी त्यांचे पालनपोषण केले. शाळेत असताना पाठ्यपुस्तके खरेदी करण्याएवढेही पैसे त्यांच्याकडे नव्हते. भाजी विकून आणि मंदिरात राहून त्यांनी शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी त्यांची बिर्ला इंस्टीट्यूट या नामांकित संस्थेत निवड झाली.

उच्च शिक्षण पूर्ण करताच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यात सामील झाले. नानाजींचे कष्ट, विचार आणि समाजसेवेची आवड बघून सरसंघचालक डॉ. केशव बळिराम हेडगेवार यांनी प्रान्त प्रचारक म्हणून त्यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविली. लोकमान्य टिळकांच्या राष्ट्रवादी विचारांनी प्ररित झालेल्या नानाजींनी सामाजिक कार्याचा यज्ञच सुरू केला. १९४० मध्ये डॉ. हेडगेवार यांच्या निधनानंतर नानाजींवर महाराष्ट्राजी जबाबदारी सोपविण्यात आली. नानाजींनी संघ कार्यात स्वत:ला झोकूनच दिले असे नाही, तर आपले संपूर्ण जीवन संघकार्याला वाहून घेतले. विनोबाजींच्या भूदान चळवळीतही नानाजींनी योगदान दिले आहे.

उत्तरप्रदेशात असताना नानाजींनी शिक्षण कार्यावर विशेष भर दिला. त्यांच्याच प्रयत्नाने गोरखपूर येथे सरस्वती शिशु मंदिर सुरू झाले. रा. स्व. संघाने १९४७ मध्ये सुरू केलेल्या ‘राष्ट्रधर्म’ आणि पांचजन्य’ या दोन साप्ताहिकाच्या संपादनाची जबाबदारी अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर होती, मात्र या नियतकालिकांची आर्थिक बाजू नानजींनी सांभाळली. १९४८ साली महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर संघावर बंदी आली. त्यामुळे भूमिगत राहून नानाजींनी कापले कार्य चालू ठेवले.

राजकारणात प्रवेश
रा.स्व. संघाच्या धुरिणांनी स्थापन केलेल्या भारतीय जनसंघ या राजकीय पक्षाचे नानाजी पहिले सरचिटणीस होते. त्यांच्यावर उत्तर प्रदेशाची जबाबदारी सोपविण्यात आली होती. आज भाजपाला या राज्यात जे यश मिळत आहे, त्याची मुहूर्तमेढ नानाजींनी रोवली आहे. कारण उ.प्र.तील प्रत्येक जिल्ह्यात जनसंघाची शाखा उघडली होती. नानाजींचे सर्वच पक्षातील नेत्यांशी चांगले संबंध होते. डॉ॰ राम मनोहर लोहिया यांच्यामाध्यमातून त्यांनी समाजवादी मंडळींशी जवळीक साधली. त्याचा फायदा १९७७ च्या निवडणुकीत जनसंघाला झाला. त्यापूर्वी १९६७ मध्ये युपीत चरण सिंह यांच्या नेतृत्वाखाली बिगर काँग्रेसी सरकार सत्तेवर आणण्यात नानाजींचे मोठे योगदान होते. त्यामुळे चरणसिंह यांनी नानाजींना ‘चाणक्य’ अशी उपाधी दिली. आणिबाणीनंतर सत्तेवर आलेल्या मोरारजी देसाई यांच्या सरकारमध्ये सामील होण्यासाठी नानाजींना अनेकांनी विनंती केली. मात्र, वयाची साठी ओलांडलेल्या मंडळींनी सत्तेपासून दूर राहावे, असे विचार असल्याने त्यांनी नम्र नकार कळविला.

सामाजिक जीवन
१९८० सालात सक्रिय राजकारणातून संन्यास घेतलेल्या नानाजींनी सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. दीनदयाल शोध संस्था आणि चित्रकूट ग्रामोदय विश्वविद्यालय या संस्था त्यांनी स्थापन केल्या. नानाजींच्या कार्याची दखल घेऊन १९९९ साली तत्कालीन एनडीए सरकारने राज्यसभेवर त्यांची निवड केली. कृषी, ग्रामोद्योग, सार्वजनिक आरोग्य, ग्रामीण अर्थव्यवस्था या क्षेत्रात नानाजींनी भरीव योगदान दिलेले आहे. दुष्काळग्रस्त बीड जिल्ह्यातही त्यांनी पाणलोट क्षेत्र विकास आणि शैक्षणिक कार्य केले आहे. जल, जंगल, जमीन, शिक्षण आणि लोकजीवन हे नानाजींच्या कार्याचे बलस्थान राहिले आहे. लोकसहगातून लोकजीवन हे त्यांच्या कार्याचे सूत्र राहिलेले आहे. तंटामुक्त गाव ही नानाजींचीच संकल्पना. चित्रकुट येथे त्यांनी पहिले आदर्श ग्राम उभारले. अण्णा हजारे यांनी नानाजींची प्रेरणा घेऊन ही संकल्पना पुढे नेली. सरकारने नानाजींच्या सामाजिक, शैक्षणिक कार्याची दखल घेऊन १९९९ मध्ये पद्म विभूषण पुरस्काराने त्यांचा सन्मान केला. २७ फेब्रुवारी २०१० रोजी वयाच्या ९५ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूपत्रातील इच्छेनुसार नानाजींवर कोणतेही अंतिम संस्कार करण्यात आले नाही. त्यांचे पार्थिव अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थानला देण्यात आले.

भारतरत्नचे महाराष्ट्रातील मानकरी
महर्षी धोंडो केशव कर्वे
पांडुरंग वामन काणे
विनोबा भावे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जे. आर.डी. टाटा
लता मंगेशकर
भीमसेन जोशी
सचिन तेंडुलकर
नानाजी देशमुख

Web Title: Nanaji Deshmukh given Bharat Ratna

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.