नानाचा रौद्रावतार..!
By Admin | Published: January 10, 2015 12:54 AM2015-01-10T00:54:24+5:302015-01-10T00:54:24+5:30
प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक नाना पाटेकर याच्या रुद्रावताराला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या संयोजकांना सामोरे जावे लागले.
पुणे : प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक नाना पाटेकर याच्या रुद्रावताराला पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या संयोजकांना सामोरे जावे लागले. चित्रपटाच्या पडद्यावर दिसणारे नानाचे रौद्ररूप रसिकांना प्रत्यक्षात पाहायला मिळाले.
झाले असे, की पाटेकर यांची भूमिका असलेल्या ‘डॉ. प्रकाश बाबा आमटे’ चित्रपटाचे प्रदर्शन राज्य शासन आणि पुणे फिल्म फाउंडेशन आयोजित आलेल्या १३व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात करण्यात आले होते.
या चित्रपटाची महोत्सवाच्या स्पर्धा विभागामध्ये निवड झाली आहे. या चित्रपटाचा शो कोथरूडमधील सिटीप्राईड चित्रपटगृहात शुक्रवारी सकाळी ११.१५ वाजता होता. पाटेकर यांना त्या ठिकाणी पोहोचण्यास १५ मिनिटे उशीर झाला. महोत्सवाच्या परंपरेनुसार चित्रपट सुरू होण्यापूर्वी कलाकार आणि तंत्रज्ञ त्या संदर्भात मनोगत व्यक्त करतात; परंतु नाना येण्यापूर्वीच चित्रपट सुरू करण्यात आला आणि त्याला मनोगत व्यक्त करण्याची संधी देण्यात आली नाही. त्यामुळे त्याच्या रागाचा पारा चढला. नानाचा हा रौद्रावतार उपस्थितांनाही पाहायला मिळाला.
महोत्सवाच्या निवड समितीचे प्रमुख समर नखाते यांना या संदर्भात विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे नाना अधिकच संतापला. त्यानंतर नाना आणि समर नखाते यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. सर्वांच्या समोरच त्यांनी संयोजकांना चांगलेच धारेवर धरले.
अखेर नाना वैतागून तेथून निघून गेला.
या संदर्भात महोत्सवाचे संयोजक म्हणाले, ‘‘महोत्सवातर्फे चार दिवस अगोदरच चित्रपटाची वेळ घोषित करण्यात आली होती. महोत्सवामध्ये सर्व चित्रपट वेळेवर सुरू करण्यात येतात. आम्ही नियमांची योग्य अंमलबजावणी केली आहे.’’
(प्रतिनिधी)
४आसनव्यवस्थेच्या नियमांमुळे प्रेक्षक भडकले. महोत्सवातील काही चित्रपटांना प्रेक्षकांची खूप गर्दी झाल्यामुळे काही प्रेक्षक चित्रपटगृहातील पायऱ्यांवर बसले; परंतु संयोजकांनी पायऱ्यांवर बसलेल्या पे्रक्षकांना बाहेर जाण्यास सांगितल्याने अनेकांचा पारा चढला.
गाणी, कवितांचे संस्कार निसर्गातून
पुणे : अजिंठा लेण्याच्या पायथ्याशी पळसखेडे माझे गाव. तेथील लोकजीवनात मिसळून गेलो. त्यांचे जीवन, संगीत जवळून पाहिले. गाणी, कवितांचा पहिला संस्कार निसर्गातून झाला. या लोकजीवनातूनच ‘मी रात टाकली, नभ उतरू आलं, अंग झिम्माड झालं’ अशी वेगळ्या वाटेची गाणी सुचली, अशा भावना ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर यांनी व्यक्त केल्या.
निमित्त होते, पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात आयोजित पत्रकार परिषदेचे. डॉ. जब्बार पटेल या वेळी उपस्थित होते. ‘रानातल्या कवितां’पासून सुरू झालेला कविता आणि गीतांचा प्रवास या वेळी महानोर यांनी उलगडला. ‘जैत रे जैत’ची गाणी लिहिण्याचे आव्हान स्वीकारले. १९ मार्च १९७७ला ‘प्रभुकुंज’वर गेलो होतो. लतादीदी, हृदयनाथ मंगेशकर हे सगळे बसले होते. सर्वांच्या मध्ये मी होतो. माझी अवस्था अभिमन्यूसारखी झाली होती. तो दिवस देशातील राजकीय पडझडीचा होता. या चित्रपटातील प्रसंग सांगून ‘गाणं लिही,’ असे सांगण्यात आले. काही वेळात ‘वाडीवरल्या वाटा गेल्या’ या ओळी लिहून दिल्या. त्यानंतर सर्वांच्या चेहऱ्यावरचे हसरे भाव बघून हायसे वाटले. हीच गोष्ट ‘नाग्या आणि चिंधी’वर चित्रित झालेल्या ‘मी रात टाकली’ची. ‘नभ उतरूं आलं, अंग झिम्माड झालं’ या गाण्याविषयी आठवण सांगताना ते म्हणाले, ‘‘झिम्माड’ म्हणजे काय असं विचारले जाई, आशाबाईही वारंवार विचारत. ‘दोघे भेटल्यानंतर’ काय हाणार, असा प्रश्नच मी त्यांना विचारला.’’
तो शायद ‘एफटीआयआय’ नहीं आता...
पुणे : बिहारमध्ये खूप टॅलेंट आहे. ही गोष्ट मला ‘बेगुसराय’ गावात सादर झालेले नाटक पाहिल्यानंतर प्रकर्षाने जाणवली. हे नाटक आधी पाहिले असते तो शायद ‘एफटीआयआय’ नहीं आता..
अशी भावना ‘खामोश’सारख्या संवादाच्या माध्यमातून रसिकांच्या मनावर दीर्घ काळ अधिराज्य केलेले ज्येष्ठ अभिनेते आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केली. पुणे आंतरराट्रीय चित्रपट महोत्सवात चित्रपटसृष्टीच्या प्रवासात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या ‘एफटीआयआय’ला त्यांनी आजवरचे सर्व पुरस्कार समर्पित केले असल्याचे सांगितले, याच इन्स्टिट्यूटविषयी पत्रकार परिषदेत ते भरभरून बोलत होते. माझ्यातील टॅलेंटला याच इन्स्टिट्यूटने ओळखले. त्या काळी गुरू-शिष्य परंपरेमध्ये अनेक गोष्टी आत्मसात करायला मिळाल्या. स्वत:मध्ये निर्माण करण्याची ती प्रक्रिया होती. ‘राज कपूर’ हे नेहमीच माझा प्रेरणास्रोत राहिले आहेत. उनका ‘आज भी मैं दिवाना हूँ और रहूंगा’.. राज कपूर, अशोककुमार किंवा किशोरकुमार यांनी अभिनयाचे कोणतेही प्रशिक्षण घेतलेले नाही. संघर्षातून त्यांनी स्वत:चे नाव सिद्ध केले. त्यांना पाहूनच मोठे झालो असल्याचे ते म्हणाले.
प्रत्येक चित्रपट
हा नवा अनुभव
पुणे : आजूबाजूच्या व्यक्तींचे बारकाईने निरीक्षण करणे हेच अभिनय करणाऱ्या कलाकारांचे सर्वांत महत्त्वाचे काम असते. कारण अभिनय कसा करावा ते शिकविता येता नाही. भावनाशील अभिनय हा मुळात आतूनच यावा लागतो. माझ्या दृष्टीने माझा प्रत्येक चित्रपट हा नवा अनुभव असतो, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनी व्यक्त केले.
चित्रपट महोत्सवानिमित्त त्यांनी शुक्रवारी पत्रकारांशी वार्तालाप करताना सांगितले, की अभिनय हा कधीच बदलत नसतो. बदलत असते ते सादरीकरण. कारण अभिनय हा मुळातच यावा लागतो. चित्रपटसृष्टीत काम करताना कॅमेऱ्याला मी मित्र मानले; त्यामुळे यशस्वी अभिनेत्री होऊ शकले. आपल्या चुलबुल्या भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या आणि अभिनयाचे ‘समर्थ’ घराणे लाभलेल्या तनुजा मुखर्जी म्हणाल्या, की माझे घराणे जरी पहिल्यापासून चित्रपटसृष्टीत होते तरी माझ्या कारकिर्दीला त्याची फार मोठी मदत झाली, असे मुळीच नाही. मी भूमिका पारखूनच स्वीकारल्या आणि दिग्दर्शक सांगेल त्याप्रमाणेच भूमिका केल्या. आपण मधुबाला, मीनाकुमारी यांच्यासारख्या अभिनेत्रींचे चाहते होतो तसेच दिलीपकुमार, किशोरकुमार यांच्यासारखे अलौकिक अभिनेते हे आपले आदर्श होते, असे सांगितले. कन्या असलेली सध्याची आघाडीची अभिनेत्री काजोल हीदेखील अतिशय ‘समर्थ’ अभिनेत्री असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.