नंदा जिचकार यांनी स्वीकारला महापौरपदाचा पदभार
By admin | Published: March 6, 2017 02:55 PM2017-03-06T14:55:56+5:302017-03-06T14:55:56+5:30
नंदा जिचकार यांनी सोमवारी नागपूर मनपा महापौरपदाचा पदभार स्वीकारला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 6 - नंदा जिचकार यांनी सोमवारी नागपूर मनपा महापौरपदाचा पदभार स्वीकारला. यावेळी 'पक्ष नेतृत्वाने माझ्यावर मोठी जबाबदारी सोपविली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात पदाधिकारी, अधिकारी व नगरसेवक अशा सर्वांची साथ घेऊ न पारदर्शक कारभाराच्या माध्यमातून शहराचा चौफेर विकास करू', अशी ग्वाही महापौर नंदा जिचकार यांनी दिली. महापालिका मुख्यालयात आयोजित महापौर पदग्रहण समारंभात त्या बोलत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जो विकासाच्या मार्ग दाखविला. त्यानुसार सर्व नगरसेवक व पदाधिकारी उत्तम काम करून जनतेची सेवा करतील. सोपवलेली जबाबदारी सक्षमपणे पार पाडतील, असेही जिचकार यावेळी म्हणाल्या. आरक्षणामुळे मिळालेल्या संधीचे सोने करीत मोठ्या प्रमाणात महिला निवडून आलेल्या आहेत. पक्ष संघटनेत काम करणा-यांना पदाची संधी मिळते. त्यामुळे पक्षसंघटनेतही मन लावून काम करा, असे आवाहन यावेळी त्यांनी नगरसेवकांना केले.
तर, गेल्या दहा वर्षात माहपालिकेतील सत्तेच्या माध्यमातून भाजपाने शहरातील ४० लाख जनतेची प्रामाणिक सेवा केली. यावर विश्वास दर्शवून जनतेने भाजपाच्या १०८ नगरसेवकांना निवडून दिले. या विश्वासाला तडा जाणार नाही, असं आश्वासन सुधाकर कोहळे यांनी दिली. पक्षाने सोपविलेली जबाबदारी उत्तमपणे पार पाडणा-यांना पक्षाने पदे दिलेली आहे. नंदा जिचकार भाजपाच्या शहर महिला आघाडीच्या अध्यक्षा आहेत. सत्तापक्षनेते संदीप जोशी व स्थायी समितीचे भावी अध्यक्ष संदीप जाधव भाजपाचे शहर महामंत्री आहेत. महापालिकेतील पदाधिकरी व नगरसेवक परिश्रम घेऊ न महापालिकेच्या पारदर्शी कारभाराच्या माध्यमातून नागपूर शहराला देशातील एक उत्तम शहर करतील, असा विश्वास कोहळे यांनी व्यक्त केला.
उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनीही विचार मांडले. सत्तापक्षनते संदीप जोशी यांनी आभार प्रदर्शनातून शहर विकासाची ग्वाही दिली. नगरसेविका दिव्या घुरडे यांनी कार्यक्रमाचे संचालन केले.
महापौरांनी पदभार स्वीकारला
जाहीर पदग्रहण समारंभापूर्वी महापौर नंदा जिचकार यांनी मावळते महापौर प्रवीण दटके यांच्याकडून पदभार स्वीकारला. तसेच उपमहापौर दीपराज पार्डीकर यांनी मावळते उपमहापौर सतीश होले यांच्याकडून तर सत्तापक्षनेते संदीप जोशी दयाशंकर तिवारी यांच्याकडून पदाची सूत्रे स्वीकारली. भाजपाचे शहर अध्यक्ष आ. सुधाकर कोहळे व प्रवीण दटके यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.