नालेसफाईवरून पालिकेत गदारोळ
By admin | Published: June 12, 2014 04:09 AM2014-06-12T04:09:43+5:302014-06-12T04:09:43+5:30
स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकीवरील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले आणि नालेसफाईच्या कामाहून सभागृहात एकच गोंधळ झाला
मुंबई : मुंबई शहरासह पूर्व-पश्चिम उपनगरांतील नालेसफाई पूर्ण झाल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला असला तरी बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधी पक्षनेत्यांसह विरोधी बाकीवरील सदस्यांनी सत्ताधाऱ्यांना फैलावर घेतले आणि नालेसफाईच्या कामाहून सभागृहात एकच गोंधळ झाला. नालेसफाईचा दावा फसवा असल्याची टीका करीत विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले असतानाच सत्ताधाऱ्यांनी त्यांना सडतोड उत्तरे देत आपली बाजू सावरून धरली.
ऐन पावसाळ्यात मुंबईकरांना पूरजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागू नये, म्हणून महापालिकेने १ एप्रिलपासून नालेसफाईची कामे हाती घेतली. महापौर सुनील प्रभू, आयुक्त सीताराम कुंटे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पाहणी करीत नालेसफाई समाधानकारक झाल्याचे म्हटले. मात्र महापालिकेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र आंबेरकर यांनी नालेसफाईच्या कामाची पाहणी करीत प्रशासनावर तोफ डागली. बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीतही आंबेरकर यांनी नालेसफाईच्या कामाच्या कुचराईचा पाढा वाचला. विरोधी पक्षातील सदस्यांनीही त्यांना समर्थन दर्शवित प्रशासनाने नालेसफाई वरवर केल्याचे म्हणणे मांडले. मात्र सत्ताधाऱ्यांनी नाल्यातील वरवर दिसणारा कचरा म्हणजे नालेसफाई झाल्यानंतर लगतच्या रहिवाशांनी नाल्यात प्लास्टिकच्या पिशव्यासह टाकलेल्या टाकाऊ वस्तू असल्याचे दाखले दिले. शिवाय नालेसफाईच्या कामादरम्यान स्वत: उपस्थित राहून नालेसफाई करून घेतल्याचे दाखले दिले. (प्रतिनिधी)