नांदेड जिल्ह्याचा डासमुक्तीचा संकल्प
By admin | Published: August 16, 2015 12:15 AM2015-08-16T00:15:25+5:302015-08-16T00:15:25+5:30
सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने उद्भवणाऱ्या साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी नांदेडच्या जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हाच गटारमुक्त पर्यायाने डासमुक्त करण्याचा संकल्प केला आहे़
- अनुराग पोवळे, नांदेड
सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित न झाल्याने उद्भवणाऱ्या साथींच्या आजारांना आळा घालण्यासाठी नांदेडच्या जिल्हा परिषदेने संपूर्ण जिल्हाच गटारमुक्त पर्यायाने डासमुक्त करण्याचा संकल्प केला आहे़ या संकल्पाला मूर्त स्वरूप येत असून, जिल्ह्यातील २०० गावे सप्टेंबरपर्यंत डासमुक्त होतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे़
ग्रामीण भागात सांडपाण्याचा व्यवस्थित निचरा न केल्यामुळे रस्त्यावर पाणी साचून नाल्या तुंबतात़ नाली व डबके यामध्ये पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती होते़ त्याचवेळी याच सांडपाण्यातून पिण्याच्या पाण्याच्या जलवाहिन्याही असतात़ त्या कुठे फुटल्यास त्याद्वारेही साथरोगांचा प्रादुर्भाव होतो़ यात हिवताप डेंगी, चिकनगुनिया आदी आजार फैलावतात़ हत्तीरोग, जपानी मेंदूज्वर या आजारांचाही डासांद्वारेच प्रसार होतो़ या डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी जिल्हा परिषदेने उपाययोजना हाती घेतल्या आहेत़ त्यात कायमस्वरूपी आणि तात्पुरत्या स्वरूपाची डास उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यात येत आहेत़
जिल्ह्यातील १ हजार ५१३ गावांमध्ये गटारमुक्त अभियान सुरू करण्यात आले आहे़ ४ लाख ८८ हजार २३० कुटुंबांसाठी ३ लाख ६३ हजार १०८ शोषखड्डे उभारण्याचे काम २५ फेब्रुवारी २०१५पासून सुरू झाले आहे़ या उपक्रमात जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागालाही सहभागी करून घेण्यात आले आहेत़ मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात ६३ प्रा़ आरोग्य केंद्र आणि ३३४ उपकेंद्र असलेल्या गावांची निवड करण्यात आली आहे़ शोषखड्डे निर्माण करून गटारमुक्तीसाठी जिल्हास्तरावर एक कक्षही स्थापन करण्यात आला़ डिसेंबर २०१५पर्यंत १०० टक्के घरांमध्ये शोष खड्डे तयार करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे़ शासनाच्या मनरेगा योजनेतून २ हजार १११ रुपये प्रति शोषखड्ड्यासाठी अनुदानही दिले जात आहे़ जिल्हा परिषदेच्या पंचायत विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त वतीने ही मोहीम राबविली जात आहे़ जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ बालाजी शिंदे, जिल्हा साथरोग अधिकारी डॉ़ दुर्गादास रोडे, विस्तार अधिकारी ए़जी़ कावळे, एस़एल़ यल्टीवार आदी परिश्रम घेत आहेत़
जिल्ह्यात या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे़ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील २०० गावे डासमुक्त होतील, असा विश्वास जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे यांनी व्यक्त केला आहे़
ंअधिकाऱ्यांचा गावातच मुक्काम
या मोहिमेच्या जनजागृतीसाठी आरोग्य विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना जनजागृतीसाठी गाव दत्तक देण्यात आले आहे़ त्याचवेळी जिल्हा परिषदेचे खातेप्रमुख, गटविकास अधिकारी, बालविकास प्रकल्प अधिकारी, गटशिक्षणाधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना गावामध्ये दर मंगळवारी मुक्कामी पाठवून गटारमुक्ती व डासमुक्ती मोहिमेची तसेच जिल्हा परिषदेच्या इतर योजनांची माहिती, जनजागृती केली जात आहे़
शोषखड्ड्यांसाठी मनरेगातून निधी
गटारमुक्तीच्या या अभियानात जिल्हा परिषदेने महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचीही मदत घेतली आहे़ मनरेगातून ८ हजार शोष खड्ड्यांच्या कामांना मंजुरी मिळाली आहे़ त्यातील २ हजार २२४ कामे पूर्णही झाली आहेत़ उर्वरित कामेही प्रगतिपथावर आहेत़ सर्वाधिक १ हजार शोषखड्ड्यांचे काम अर्धापूर तालुक्यात पूर्ण झाले आहे़ तर नायगाव तालुक्यात ५८५ आणि भोकर तालुक्यातील २७५ कामांचा समावेश आहे़