नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितचा उमेदवार ठरला; पुन्हा त्याच चेहऱ्याला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2024 07:04 PM2024-10-28T19:04:57+5:302024-10-28T19:10:14+5:30
नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी वंचितने आपल्या उमेदवाराची घोषणा केली.
Nanded Lok Sabha By Election 2024 : नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आता प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीने आपला उमेदवार दिला आहे. महाराष्ट्रात सध्या विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मंगळवारी अर्ज करण्याचा शेवटचा दिवस आहे, त्यामुळे आतापर्यंत सर्वच पक्षांनी जवळपास आपले सर्व उमेदवार जाहीर केले आहेत. विशेष म्हणजे या विधानसभा निवडणुकीसोबतच नांदेड लोकसभेची पोटनिवडणूकदेखील (Nanded Loksabha byelection) होत आहे. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने नांदेडची जागा जिंकली होती. पण, काँग्रेस खासदार वसंत चव्हाण यांच्या अकाली निधनामुळे या ठिकाणी पोटनिवडणूक होत आहे.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्रातील नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्यावतीने अविनाश भोसीकर यांनाच उमेदवारी दिली आहे. वंचितने लिंगायत समाजाचा चेहरा मैदानात उतरवला आहे. लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये वंचितचे अविनाश भोसीकर हे तिसऱ्या क्रमांकावर राहिले होते. त्यांना एकूण ९२५१२ मते मिळाली होती. तर भाजपचे प्रतापराव चिखलीकर ४६९४५२ मतांसह दुसऱ्या स्थानावर होते. तर, काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी ५९४४२ मतांनी विजय मिळवला होता.
वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कमिटीने महाराष्ट्र 16- नांदेड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने अविनाश भोसीकर यांना उमेदवारी जाहीर.! #MaharashtraAssembly2024#VoteForVBA#VoteForGasCylinderpic.twitter.com/3WoVmizUt4
— Vanchit Bahujan Aaghadi (@VBAforIndia) October 28, 2024
दरम्यान, नांदेडच्या पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने वसंत चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर केली आहे. दुसरीकडे भाजपला नांदेडसाठी उमेदवार मिळत नव्हता. पण, अखेर भाजपने नांदेड दक्षिण ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉ. संतुक हंबर्डे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. संतुक हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघाचे काँग्रेस आमदार मोहन हंबर्डे यांचे भाऊ आहेत. आता नांदेड लोकसभेत मतदार कुणाच्या बाजूने कौल देणार आणि ही लढत तिरंगी होते का हे पाहण्याजोगे असेल.
खासदार वसंतराव चव्हाण यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या नांदेड लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोटनिवडणूक जाहीर झाली. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीसोबतच २० नोव्हेंबर रोजी नांदेड लोकसभेच्या जागेसाठी मतदान होणार आहे. नांदेड लोकसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसने दिवंगत खासदार वसंतराव चव्हाण यांचे सुपुत्र रवींद्र चव्हाण यांना उमेदवारी जाहीर केली आहे.