"नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी, अर्धी काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही"
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2024 07:26 PM2024-04-11T19:26:48+5:302024-04-11T19:27:08+5:30
Nanded Loksabha Election: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अमित शाह हे नांदेडला आले होते. त्यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे, शरद पवारांसह काँग्रेसवर जोरदार टीका केली.
नांदेड - Amit Shah on Mahavikas Aghadi ( Marathi News ) राहुल गांधींच्या नेतृत्वात ३ पक्ष एकत्र झालेत. नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि एक अर्धवट उरलेली काँग्रेस पक्ष, शरद पवार, उद्धव ठाकरे यांनी दोघांनी काँग्रेसला अर्धे केले. तीन तिघाडा, काम बिघाडा हे तिघे महाराष्ट्राचं भलं करू शकतात का? निवडणुकीनंतर हे तिन्ही पक्ष आपापासतील मतभेदामुळे वेगळे होणार आहेत असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला.
नांदेड इथं महायुतीचे उमेदवार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या प्रचारासाठी शाह आले होते. त्यावेळी ते म्हणाले की, ही निवडणूक नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवण्याची आहे. तुमचं एक मत केवळ प्रतापराव चिखलीकरांना विजयी करणार नाही तर दिल्लीत मोदींना पंतप्रधान बनवणारे आहेत. आज आपली अर्थव्यवस्था जगात पाचव्या नंबरवर आहेत. पुन्हा एकदा सरकार आल्यास ही अर्थव्यवस्था तिसऱ्या नंबरवर जाणार आहे. ७० वर्ष काँग्रेसनं काश्मीरात कलम ३७० कायम ठेवले. काँग्रेस शासन काळात पाकिस्तानातून दहशतवादी यायचे, बॉम्बस्फोट घडवून जायचे. २०१४ मध्ये मोदींना पंतप्रधान बनवलं. पुलवामा घडलं, त्यानंतर १० दिवसांत एअर स्ट्राईक करून पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना संपवलं. आमच्या देशाचं सैन्य आणि देशाच्या सीमेला कुणी वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला सोडणार नाही असा संदेश भारताने जगाला दिला असं त्यांनी सांगितले.
त्याचसोबत महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या सर्व राज्यात असलेल्या नक्षलवादाला मूळापासून उखडून टाकण्याचं काम भाजपानं केले. ७० वर्ष राम मंदिर प्रकरण थंडावले होते. २०१४ नंतर निकालही लागला, भूमिपूजन झालं आणि राम मंदिरही उभं राहिले. ५०० वर्षांनी रामनवमीला पहिल्यांदाच प्रभू राम टेंटमध्ये नव्हे तर भव्य मंदिरात असतील. काँग्रेस पक्षाने रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण दिले परंतु त्यालाही ते आले नाही. ही निवडणूक २०४७ मध्ये देशाला पूर्ण विकसित देश बनवण्याचा संकल्प आहे. मजबूत भारताचा पाया रचण्याचा हा काळ आहे. एक असा भारत ज्याच्यासमोर कुणीही उभं राहून आव्हान देऊ शकत नाही असं अमित शाहांनी म्हटलं.
शरद पवारांनी हिशोब द्यावा
शरद पवारांनी एक सांगावे, १० वर्ष तुम्ही काँग्रेस शासन काळात मंत्री होता, तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? त्याचा हिशोब द्यावा. १० वर्षात पवारांनी १ लाख ९१ हजार कोटी दिले होते. पण मोदींच्या १० वर्षात ७ लाख १५ हजार कोटी महाराष्ट्राला देण्याचं काम झाले. त्याशिवाय ३ लाख ९० हजार कोटी विकासासाठी दिले, ५ लाख ७५ हजार कोटी राष्ट्रीय महामार्गासाठी दिले. उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस महाराष्ट्राचा विकास करू शकत नाही. महाराष्ट्राचा विकास नरेंद्र मोदी, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार सरकारही करू शकते. १ कोटी २० लाख घरांमध्ये पाणी पोहचवलं, आयुष्यमान भारत योजनेतून अनेकांना लाभ होतोय. ७ कोटी जनतेला कोरोना आल्यापासून ५ किलो धान्य देण्याचं काम केले. शरद पवार इतके वर्ष राजकारणात होते पण महाराष्ट्राचा विकास करू शकले नाहीत अशी टीका अमित शाह यांनी शरद पवारांवर केली.