कुपोषित बालकांचा नंदुरबार ‘स्क्रीनिंग पॅटर्न’ राज्यभर राबविणार; राज्य सरकारचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2020 02:10 AM2020-08-23T02:10:00+5:302020-08-23T07:36:25+5:30
कोरोनाच्या परिस्थितीतही उत्तम सर्वेक्षणाचा नमुना
रमाकांत पाटील
नंदुरबार : लॉकडाऊनमुळे अंगणवाड्या बंद असतानाही नंदुरबार जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग, आरोग्य विभाग व युनिसेफने जिल्ह्यातील ० ते सहा वयोगटातील बालकांच्या सर्वेक्षणासाठी राबविलेली धडक मोहीम यशस्वी ठरली आहे. हा नंदुरबार पॅटर्न आता राज्यात सर्वत्र राबविण्याच्या सूचना राज्याच्या महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनी दिल्या आहेत.
नंदुरबार जिल्ह्यात दरवर्षी दिवाळीनंतर हजारो कुटुंबे रोजगारासाठी परराज्यात स्थलांतरीत होतात आणि फेब्रुवारीनंतर गावी परततात. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण विभाग व आरोग्य विभागातर्फे गेल्या पाच वर्षापासून दरवर्षी मार्चमध्ये कुपोषित बालकांच्या सर्व्हेक्षणासाठी स्क्रिनिंग प्रक्रिया राबवितात. मात्र यंदा कोरोना व लॉकडाऊनमुळे ही प्रक्रिया लांबली. त्यातच अंगणवाड्याही बंद असल्याने ० ते सहा वयोगटातील बालकांच्या आरोग्यावर व आहारावर नियंत्रण ठेवणे काहीसे अवघड झाले होते. परंतु काटेकोर नियोजन करून आरोग्य तपासणी करण्यात आली. याशिवाय लसीसकरण आणि सॅम व मॅम बालकांच धडक शोध मोहीमही राबविण्यात आली.
कोविडची दक्षता व नियमांचे पालन
कोविडच्या पार्श्वभूमीवर ही धडक मोहीम राबविण्यात आल्याने सर्व नियमांचे पालन करण्यात आले. त्यासाठी तपासणी करताना आधी बालक किंवा गरोदर माता यांची ताप, खोकला, श्वास घेण्याचा त्रास याची चौकशी करून तपासणी करण्यात आली. वजन मापे करण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांनंतर साहित्य निर्जंतुकीकरण करण्यात आले. सर्वेक्षण करणाऱ्या प्रत्येक अधिकारी व कर्मचाऱ्यांना ट्रिपल लेअर मास्क, फेस शिल्ड, ग्लोज, सॅनिटाईझर आदी साहित्य देण्यात आले.
सॅम व मॅम बालकांची शोध मोहीम तथा किशोरवयीन मुली व गरोदर मातांची आरोग्य तपासणीसाठी जिल्हा परिषदेने राबविलेली विशेष धडक मोहीम चांगल्या पद्धतीने राबविली गेली. त्याची दखल महिला बालकल्याण विभागाच्या सचिवांनीही घेतली असून हाच पॅटर्न राज्यात सर्व जिल्ह्यात राबविण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. त्यासाठी आम्ही तयार केलेला सूक्ष्म कृती आराखडा त्यांनी मागविला आहे. -विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. नंदुरबार.