नंदुरबार : दुर्गम भागातील विद्युतीकरणासाठी १८६ कोटींचा आराखडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2016 06:52 PM2016-10-27T18:52:25+5:302016-10-27T18:52:25+5:30
जिल्ह्यातील आदिवासी ७५० पाडे व ८६ गावांमध्ये वीज पोहचविण्यासाठी १८६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे
ऑनलाइन लोकमत
नंदुरबार, दि. २७ : जिल्ह्यातील आदिवासी ७५० पाडे व ८६ गावांमध्ये वीज पोहचविण्यासाठी १८६ कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने ही कामे करण्यात येणार असून राज्याकडूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्हा नियोजन व विकास समितीची बैठक संपल्यानंतर पत्रकारांशी बोलतांना महाजन म्हणाले, दुर्गम भागातील गाव, पाडे विद्युतीकरणासाठी १८६ कोटींचा आराखडा आहे. त्यात डीपीडीसीचा मंजूर निधी आणि केंद्र शासनाच्या विविध योजनेअंतर्गत निधीतून ही कामे करण्यात येणार आहे. परंतू राज्याकडूनही काही निधी मिळू शकतो किंवा कसा याचीही चाचपणी करून निधी मिळविणार असल्याचे त्यांनी सांगितले.
गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा व तालुकास्तरावरील विविध समित्यांवरील अशासकीय सदस्यांची नियुक्त रखडली आहे. येत्या महिनाभरात तालुकास्तरीय सर्व समित्या गठीत होतील असेही त्यांनी सांगितले. जिल्हास्तरीय समित्यांबाबत मात्र त्यांनी स्पष्टपणे सुतोवाच केले नाही.
जिल्ह्याबाबत पालकमंत्र्यांकडून होणारा दुजाभाव आणि केवळ तीन ते चार महिन्यातून एकदा येणे याबाबत जिल्ह्यातील जनतेत असलेल्या नाराजीबाबत बोलतांना त्यांनी नाशिक जिल्ह्याचेही पालकमंत्रीपद आपल्याकडे असल्याने आणि मध्यंतरी दुष्काळ, राजकीय घडामोडी यामुळे येता आले नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यापुढे जिल्ह्याचा पालकमंत्री राहील की नाही सांगता येत नाही परंतू राहिल्यास किंवा न राहिल्यास नियमित संपर्कात राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रिक्त जागा तातडीने भरणे, तरंगता दवाखाना वारंवार बंद पडणे, बांबू मिशनच्या शाळांसाठीचे तीन कोटी रुपये आणि इतर बाबींवरही त्यांनी माहिती दिली.